• Sat. Sep 21st, 2024
ढिगाऱ्याखालील लोकांना वाचवण्याची धडपड, जवानाने धाव घेतली, पण अचानक जीव गेला; नेमकं काय घडलं?

रायगड : निसर्गाच्या सानिध्यात पारंपारिक पद्धतीने राहणाऱ्या आदिवासी कुटुंबांवर काळाने घाला घातला आहे. खालापूर येथील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या इर्शाळवाडीवर दरड कोसळली असून झोपेत असतानाच काही समजण्याच्या आतच होत्याचं नव्हतं झालं. या दुर्घटनेत एकूण १२० हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत पाच ते सहा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसंच २७ जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे. मात्र हे बचावकार्य करत असताना अग्निशमन दलाच्या एका जवानाचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

इर्शाळवाडीवर दरड कोसळल्याची माहिती मिळताच तात्काळ मदतीसाठी हालचाली सुरू झाल्या. नवी मुंबई महानगरपालिकेतील अग्निशमन दलाचे पथकही घटनास्थळी दाखल झालं होतं. मात्र हे मदतकार्य सुरू असतानाच अनेक अडचणी येत होत्या. वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू होता. मात्र अडचणींचा डोंगर पार करत सगळे जवान मदतकार्य करत होते. परंतु अशातच एक दुर्दैवी अशी घटना घडली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशामक पथकातील सहाय्यक केंद्र अधिकारी शिवराम ढुमणे यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं.

मोठी बातमी: दरड कोसळून अख्खं गाव ढिगाऱ्याखाली; ५ ते ६ मृतदेह बाहेर काढले, २७ जणांना वाचवलं

शिवराम ढुमणे यांना अस्वस्थ वाटू लागल्याने इतर सहकाऱ्यांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्याच्या हालचाली सुरू केल्या. मात्र वाटेतच ढुमणे यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कर्तव्य बजावत असतानाच झालेल्या ढुमणे यांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकी कुठे घडली दुर्घटना?

रायगड जिल्ह्यातील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या चौक गावापासून ६ किमी डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात इर्शाळवाडी हे आदिवासी बांधवांचं गाव आहे. येथे आदिवासी ठाकूर समाजाची अनेक घरे आहेत. या घरांवर दरड कोसळली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या वाडीतील ९० टक्के घरे ढिगाऱ्याखाली गेली असून मोठी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed