आदर्श नागरी सहकारी पतसंस्था ठेवीदार संघर्ष कृती समितीतर्फे हा मोर्चा निघाला. खासदार इम्तियाज जलील यांची प्रमुख उपस्थिती होती. मोर्चामध्ये शहरासह जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर, कन्नड आणि विविध भागातून ठेवीदार सहभागी झाले होते. क्रांतीचौकातून मोर्चा सिल्लेखाना, पैठण गेट, बाराभाई ताजिया, औरंगपुरा, महात्मा फुले चौक, खडकेश्वर महादेव मंदिरमार्गे मिलकॉर्नरहून पोलिस आयुक्तालयावर पोहोचला. पोलिस आयुक्तालयावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारासमोर ठेवीदारांचा मोर्चा येऊन धडकला.
समितीचे पल्लवी काथार, संतोष वैद्य, विजय सपकाळ, रघुनाथ वीर, दादा सय्यद यांच्यासह अन्य ठेवीदारांसह खासदार जलील यांनी पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांची भेट घेतली. या भेटीत पोलिस आयुक्तांसमोर काही ठेवीदारांनी आपल्या भावना व्यक्त केले. तसेच या घोटाळ्यामुळे गोरगरिबांचे पैसे अडकल्याचेही सांगितले. प्रकरणातील प्रमुख आरोपींना अटक केली असल्याची माहिती आयुक्तांनी या प्रसंगी दिली. अटक करण्याची प्रक्रिया सुरू असून या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले असल्याची माहिती दिली. ठेवीदारांची झालेल्या फसवणुकीसाठी पोलिस विभागाकडून कायदेशीर पूर्ण प्रकिया राबविण्यात येणार असल्याचे संकेत दिले. या वेळी खासदार जलील यांनी या प्रकरणात आदर्श पतसंस्थेचे लेखापरीक्षक आणि अकाऊंटंटचीही चौकशी करावी, त्यांनाही ताब्यात घ्यावे अशी मागणी केली. पोलिस आयुक्तांनी याबाबत कारवाईचे आश्वासन दिले.
तक्रारी नोंदविण्यासाठी विशेष काउंटर
पोलिस आयुक्तांनी या सर्व तक्रारी सिडको पोलिस ठाण्यात घेण्यासाठी विशेष खिडकी तसेच विशेष तक्रार केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय सिडको पोलिस ठाण्यात आदर्श पतसंस्था घोटाळ्याशी संबंधित संचालकांच्या वैध अवैध संपत्तीची माहितीही जमा करू शकतात. अशीही व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती खासदार जलील यांनी दिली.
ठेवीदारांचा एक एक पैसा मिळवून देण्यासाठी आंदोलन
पोलिस आयुक्तावर मोर्चा काढून ठेवीदारांनी आपला आक्रोश व्यक्त केला आहे. पोलिस आयुक्तालयावर मोर्चा काढून ठेवीदारांचे पैसे मिळणार नाही. यासाठी सहकार विभागासह विविध ठिकाणी आंदोलन केले जातील. तसेच नियोजन सुरू आहे. सध्या हा २०० कोटी रूपयांचा घोटाळा वाटत आहे. मात्र या घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. यामुळे ठेवीदारांचे १०० टक्के पैसे परत मिळतील यासाठी आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती खासदार जलील यांनी दिली.
खासदार जलील यांचा आरोप
पोलिस आयुक्तांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना, खासदार इम्तियाज जलील यांनी आदर्श पतसंस्था घोटाळा हा राजकीय वरदहस्ताशिवाय होऊ शकत नाही, असा आरोप करीत या प्रकरणात राजकारण आणायचे नव्हते. मात्र देशभरातील बँका ज्यांच्या अखत्यारित आहेत, असे केंद्रीय अर्थमंत्री ठेवीदार पीडितांना भेटत नाहीत. सहकार मंत्री म्हणून पदावर राहिलेले राज्याचे मंत्रीही भेटत नाही. उलट केंद्रीय अर्थ राज्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री बर्थडे सेलिब्रेशन करीत आहेत, असा आरोपही खासदार जलील यांनी केला.
पदाधिकाऱ्यांना सूचना
आदर्श नागरी पतसंस्था ठेवीदार संघर्ष कृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात खासदार इम्तियाज जलील हे सहभागी झाले होते. ते ठेवीदारांसोबत पायी पोलिस आयुक्तालयापर्यंत आले. मात्र या आंदोलनात एमआयएमचे पदाधिकारी सर्वात मागे राहतील, अशा सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या होत्या.