या प्रकरणी भाजपचे नगरसेवक स्वप्नील शिंदे यांच्यासह नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेवरून शहरातील राजकीय तणाव आणखी वाढला आहे. शहरातील खून, मारामाऱ्यांच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत असून यामध्ये उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालण्याची मागणी करण्यात येत आहे.
चत्तर नगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे कार्यकर्ते होते. राज्यात वातावरण बदलेले असले तरी स्थानिक पातळीवर भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये जुने वाद कायम आहेत. त्यामुळे या घटेनमुळे राजकीय तणावही वाढणार आहे.
शनिवारी रात्री एकवीरा चौकात चत्तर यांच्यावर हल्ला झाला होता. चत्तर यांच्या शेजारी राहणाऱ्या मुलासोबत काही मुलांचा वाद झाला होता. मुलांच्या सांगण्यावरून चत्तर यांनी मध्यस्थी करून वाद मिटविला. मात्र, त्यानंतर काही वेळातच भाजपचे नगरसेवक स्वप्नील शिंदे व त्यांच्या कार्यकर्ते तेथे आले. त्यांनी चत्तर यांच्यावर लोखंडी रॉड, काचेच्या बाटल्या, वायर रोपने हल्ला केला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अंकुश चत्तर यांच्यावर नगर शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे आमदार जगताप यांनी धाव घेतली.
पोलिसांनी आरोपींविरूद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले. मात्र, नगरसेवक शिंदे व अन्य आरोपी फरार झाले होते. रविवारी दिवसभर पोलिसांनी शोध घेतला.
दरम्यान, गंभीर जखमी असलेल्या चत्तर यांचा सोमवारी पहाटे मृत्यू झाला. त्यामुळे पोलिसांनी आता खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी नगरसेवक स्वप्निल रोहिदास शिंदे (रा. वैदवाडी), अक्षय प्रल्हाद हाके (रा. नगर), महेश नारायण कुऱ्हे (रा. सावेडी), विकी ऊर्फ सुरज राजन कांबळे (रा. नगर), अभिजित रमेश बुलाखे (रा. गजराज फॅक्टरी समोर, नगर) यांना अटक केली. शिंदे, कुऱ्हे, कांबळे, बुलाखे यांच्या विरोधात पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींना अटक केली आहे.