• Tue. Mar 10th, 2026
    PSI पोस्ट काढली, पोलीस बहिणीला मानाचा सॅल्यूट ठोकला, शब्द खरा करुन दाखवला!

    सुशील राऊत, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : कठीण परिस्थितीमध्ये मोठ्या बहिणीने कष्टाच्या जोरावर खाकी वर्दी मिळवली. बहिणीच्या यशातून प्रेरित होऊन नववीत असलेल्या लहान भावाने मी तुझ्यापेक्षाही मोठा अधिकारी होऊन तुला सॅल्युट करेल असा शब्द दिला. जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर दिलेला शब्द सत्यात उतरवून दाखवला आहे. पोलीस कॉन्स्टेबल अनिता यांचा लहान भाऊ आशिष मात्रे आता पोलीस उपनिरीक्षक झाला आहे.

    आशिष खंडेराव मात्रे असं पोलीस निरीक्षक झालेल्या तरुणाचं नाव आहे. तो मूळचा छत्रपती संभाजी नगर शहरातील आहे. आशिषचे वडील शेती करतात तर आई गृहिणी आहे. आशिषचे प्राथमिक शिक्षण त्रिमूर्ती माध्यमिक शाळा येथून पूर्ण झालं तर महाविद्यालयीन शिक्षण सरस्वती भुवन महाविद्यालयातून पूर्ण झालं. आशिष नववीत असताना मोठी बहीण अनिता हिने घरच्या कठीण परिस्थितीमध्ये अभ्यासात सातत्य, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर ती खाकी वर्दी मिळवली. याचवेळी अनिता यांचा लहान भाऊ आशिषला खाकी वर्दीबद्दल आकर्षण निर्माण झालं. बहिणीने मिळवलेल्या यशानंतर आशिषनेही मोठ्या बहिणीला शब्द देत मी तुझ्यापेक्षा मोठा अधिकारी होईल असा शब्द दिला.

    दरम्यान आशिष पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असताना त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला सुरुवात केली. अभ्यासाची दिशा मिळावी यासाठी सुरुवातीला वर्षभर शिकवणी लावली. त्यानंतर स्वतःच घरच्या घरी अभ्यास करत सातत्य ठेवलं. विज्ञान हा विषय अवघड जात असल्यामुळे त्या विषयावरती अधिक भर दिला. त्यासोबतच मैदानावरती विशेष वेळ घालवला कसून सराव केला. परीक्षेच्या पूर्वी पंधरा दिवस सातत्याने रिविजन केलं.

    स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली तेव्हापासून मी सातत्याने अभ्यास आणि मैदानी सरावावरती विशेष भर दिला. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना मी मोबाईलचा वापर केला मात्र सोशल मीडिया न वापरता अभ्यासासाठी मोबाईलचा वापर केला. आज मी पोलीस उपनिरीक्षक झालो आहे, मला आनंद वाटतो आहे. मात्र इथेच न थांबता माझं क्लास वन अधिकारी होण्याचं स्वप्न आहे. त्यासाठी माझी तयारी सुरू असल्याचं आशिष मात्रेने सांगितलं.

    माझा लहान भाऊ आशिष लहानपणापासूनच अभ्यासामध्ये हुशार होता. जेव्हा मी पोलीस भरती झाले तेव्हाच त्यांनी मला मी पण तुझ्यापेक्षा मोठा अधिकारी होईल, असा शब्द दिला आणि तेव्हापासून सातत्याने अभ्यास सुरू ठेवला. आज तो माझ्यापेक्षाही मोठा अधिकारी झाला आहे. त्यामुळे मला त्याचा अभिमान वाटतोय, भविष्यामध्ये त्यांने अजून मोठी पोस्ट काढावी, अशा शुभेच्छा आशिषच्या बहिणीने त्याला दिल्या.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *