• Mon. Nov 25th, 2024
    वंचित बहुजन आघाडीच्या नेत्याची काकाकडून निर्घृण हत्या; घटनेनं जिल्ह्यात खळबळ

    जालना : वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्हा महासचिव संतोष ज्ञानदेव आढाव यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना काल १५ जुलै रोजी रात्री ८ ते ९ वाजेच्या दरम्यान रामनगर येथील मंठा रोड लगत असलेल्या गायरान जमिनीवर घडली. या घटनेनं जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.

    याबाबतची सविस्तर माहिती अशी की, जालना तालुक्यातील हडप सावरगाव येथील वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव संतोष आढाव आणि त्यांचे काका निवृत्ती आढाव यांच्यामध्ये रामनगर शिवारातील गायरान जमिनीवरून वाद सुरू होता. या जमिनीच्या वादातूनच संतोष आढाव, त्यांचा भाऊ संजय आढाव आणि सिद्धार्थ मगरे यांना सात ते आठ लोकांनी दगड, लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत संतोष आढाव हे जागीच ठार झाले, तर त्यांचे भाऊ संजय व सिद्धार्थ मगरे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

    पुण्यातून रायगडला जाण्यासाठी नवा मार्ग, पैशांसाठी प्रवासाचा वेळ वाचणार, जाणून घ्या सविस्तर

    घटनेची माहिती मिळताच परतूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश बुधवंत, मौजपुरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश धोंडे घटनास्थळी पोहोचले आणि संतोष आढाव यांचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालय शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला, तर जखमींना जालना येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष सविताताई मुंडे यांनी भेट दिली असून यावेळी कार्यकर्ते आणि नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात गर्दी केली होती.

    दरम्यान, पोलिसांनी तातडीने पाऊले उचलत आरोपी निवृत्ती पाराजी आढाव यास ताब्यात घेतले आहे. जखमी संजय यांच्या तक्रारीवरून निवृत्ती आढाव, योगेश आढाव, वंदना आढाव, दीपक जाधव, चुलत बहीण स्वाती हिचा पती अशा ५ जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *