या घटनेची माहिती मिळताच मेढा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. साताऱ्यातून शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमचे जवानही घटनास्थळी मदत कार्यासाठी पोहोचले असून बचाव कार्य सुरू आहे.
याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जावळी तालुक्यातील एकीव धबधब्यावर आज फिरण्यासाठी चार युवक आले होते. मद्य पिऊन त्यांच्यात भांडणे झाल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. भांडणामधेच मुख्य धबधब्याच्या खालच्या बाजूला भांडण करत गेले असता दोघेजण खोल दरीत कोसळले. दरम्यान रात्रीची वेळ, मुसळधार पाऊस व अवघड जागा असल्यामुळे घटनास्थळी मदत कार्य करण्यास व त्यांच्यापर्यंत पोहचण्यास अडचणी येत आहेत.
जखमींपैकी त्यातील एकाशी संपर्क होत असून दुसरा गंभीर जखमी असल्याचे समजत आहे. घटनास्थळी मेढा पोलीस पोचले असून दरीत पडलेल्या युवकांना काढण्यासाठी शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले आहे. अंधार आणि पावसामुळे मदत कार्यात अडचणी निर्माण होत आहेत. कड्यावरून दरीत पडलेले युवक एक बसाप्पाचीवाडी व एक सातारा करंजे येथील असल्याची माहिती समोर येत आहे.
पावसाळ्यात एकीव धबधब्यावर तरुणांची नेहमीच हुल्लडबाजी होत असल्याने शनिवार व रविवार पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी येथील स्थानिक ग्रामस्थ व पर्यटकप्रेमी करत आहेत.