जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील चांदसर येथील शुभम साहेबराव शिंदे या तरुणाच्या संघर्षाची प्रेरणादायी कहाणी आहे. अवघ्या २५ व्या वर्षीच शुभम हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पीएसआयच्या परीक्षेत पास झाला. विशेष म्हणजे चार ते पाच हजार लोकसंख्येच्या चांदसर या गावातील पहिलाच अधिकारी होण्याचा मान सुद्धा शुभम याने पटकावला आहे.
धरणगाव तालुक्यातील चांदसर या छोट्याश्या गावातील शुभम साहेबराव शिंदे हा रहिवासी आहे. आई, एक बहिण असा शुभमचा परिवार. बहिण मोठी तर शुभम लहान आहे. शुभमचे वडील हे खाजगी वायरमन होते. शुभम दहावीत शिकत असतांना, त्याच्या वडिलांचं निधन झालं होतं. घरातील कर्ता पुरूष गेल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. वडिलांच्या निधनानंतर दोन मुलांची आणि कुटुंबाची सर्व जबाबदारी ही शुभमच्या आई सरला शिंदे यांच्या खांद्यावर येवून पडली. ऐन उमेदीच्या काळात पती गेल्याचं दु:ख सरला या कवटाळून बसल्या नाहीत. दोन्ही मुलांसाठी सरला शिंदे यांनी पदर खोचला आणि त्या घराबाहेर पडल्या.
सरला शिंदे यांच्याकडे घरची सहा एकर शेती आहे. ही शेती करण्याबरोबरच मुलांच्या शिक्षणात कुठेही कमी पडू नये म्हणून सरला शिंदे ह्या दुसऱ्यांच्या शेतात सुध्दा मजूर म्हणून कामाला जावू लागल्या. आपल्या शेतातील कामे संपली की त्या इतरांच्या शेतात मजुरीसाठी जायच्या. अशा पध्दतीने सरला शिंदे यांनी मुलगा शुभम आणि त्यांची मुलगी अशा दोघांचे शिक्षण पूर्ण केलं.
पदवीला शिकत असताना शुभम हा खाजगी क्लासच्या सेमीनारसाठी गेला होता. याठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या, तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा त्यांच्या आई वडिलांसोबत सत्कार करण्यात आला. मुलाबरोबरच आई वडिलांचा सत्कार होतोय, हे पाहून याचठिकाणी शुभम याने अधिकारी होण्याची मनाशी खूनगाठ बांधली. शुभम याला सुरुवातीपासून पोलीस खात्याचं विशेष आकर्षण होतं. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देवून पोलीस उपनिरिक्षक होण्याचा शुभमने निर्णय घेतला आणि त्याचा प्रवास सुरु झाला.
आईचे कष्ट पाहून अभ्यास करण्यासाठी उर्जा मिळायची
मित्रांच्या माध्यमातून पदवीचं शिक्षण घेत असतानाच शुभम याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची माहिती घेतली. त्यानंतर त्याने युट्युब बरोबरच सोशल मिडीयाच्या माध्यमातून परीक्षेच्या तयारीबाबतची माहिती घेतली> अधिकारी झालेल्या तरुणांचे व्हिडीओ त्यांच्या मुलाखती बघितल्या. अशा अनेकांच्या मुलाखतीतून त्यांनी वाचलेल्या पुस्तकाची यादी शुभमला मिळाली. अशा पध्दतीने अनेक मुलाखती पाहून प्रत्येकाचा संदर्भ घेत शुभमने अभ्यासासासाठी निवडक अशा स्वत:ची पुस्तकाची लिस्ट तयार केली. खाजगी क्लास लावण्यासारखी कुटुंबाची परिस्थिती नव्हती. त्यामुळे घरच्या घरीच शुभम अभ्यास करायला लागला.
शुभमने कठोर परीश्रम आणि प्रचंड जिद्दीने अभ्यास केला. जी तयारी केली, त्या तयारीच्या जोरावर सप्टेंबर २०२१ मध्ये पहिल्यांदाच शुभमने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात शुभम हा परीक्षा उत्तीर्ण झाला. त्यानंतर मुख्य परीक्षेसाठी शुभमने जळगावला अभ्यासिका लावली. अभ्यासात कुठेही कमी पडू नये म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे संपर्क क्रमांक मिळवत, शुभमने त्यांचे सुध्दा मार्गदर्शन घेतले. अशा पध्दतीने दिवसरात्र अभ्यास करुन २०२२ मध्ये झालेली मुख्य परीक्षा उत्तीर्ण होत शुभमने त्याच्या पहिल्याच प्रयत्नात यशाला गसवणी घातली व अवघ्या २५ व्या वर्षीच अधिकारी म्हणून अंगावर वर्दी चढविली.
गावातला पहिलाच अधिकारी, गावकऱ्यांना मोठा अभिमान
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होणारा शुभम हा गावातला पहिलाच अधिकारी झाला आहे. त्यामुळे शुभमचा त्याच्या गावकऱ्यांना मोठा अभिमान आहे. शुभमच्या माध्यमातून गावातला पहिलाच अधिकारी झाल्याच्या आनंदात संपूर्ण गावकऱ्यांनी शुभमची वाजत गाजत मिरवणूक काढली आणि मोठा आनंद व्यक्त केला.