विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत महायुतीनं सत्ता राखली आहे. भाजपनं सर्वाधिक १३२ जागा जिंकलेल्या आहेत. त्यामुळे पुढील मुख्यमंत्री भाजपचाच व्हावा यासाठी पक्षानं जोरदार तयारी सुरु केली आहे.
असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमचे नेते सय्यद असीम वकार यांनी राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना आवाहन केलं आहे. भाजपला सत्तेत येण्यापासून रोखायचं असल्यास आम्ही सुचवत असलेल्या फॉर्म्युलावर काम करा. यामध्ये आमचा पक्ष नक्कीच साथ देईल, असं सय्यद असीम वकार यांनी म्हटलं आहे.
महायुतीच्या आणखी ६ जणांना आमदार होण्याची संधी; दणदणीत विजयानं लॉटरी, कोणाकोणाची वर्णी?
‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खुर्ची सोडायची नाही. पण सव्वाशेहून अधिक जागा जिंकल्यानं भाजप मुख्यमंत्रिपद सोडण्यास तयार नाही. शिंदेंची महत्त्वाकांक्षा पाहता विरोधकांकडे हीच संधी आहे. महाविकास आघाडी भाजपचाच फॉर्म्युला वापरु शकते. भाजपला त्यांच्याच रणनीतीच्या आधारानं मात द्यायला हवी,’ असं सय्यद असीम वकार म्हणाले.
‘एकनाथ शिंदे यांच्याकडे ५७ आमदार आहेत. तर अजित पवारांकडे ४१ आमदार आहेत. दोघांकडे मिळून ९८ आमदार होतात. महाविकास आघाडीत ५० आमदार आहेत. या सगळ्यांची गोळाबेरीज केल्यास ती १४८ च्या घरात जाते. या संख्याबळाच्या आधारे सत्ता स्थापन करता येऊ शकते,’ अशी आकडेवारी सय्यद असीम वकार यांनी मांडली.
Uddhav Thackeray: उद्धवसेनेच्या विधानसभा गटनेतेपदी आक्रमक नेत्याची वर्णी; आदित्य ठाकरेंकडेही मोठी जबाबदारी
सरकार स्थापनेचा फॉर्म्युला प्रत्यक्षात आणण्यासाठी शरद पवारांना त्यांचे पुतण्या अजित पवारांशी संवाद साधावा लागेल. दुसरीकडे राहुल गांधी, उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंना आपल्यासोबत घ्यावं लागेल. असं झाल्यास भाजपची सगळी समीकरणं बिघडू शकतात. हा फॉर्म्युला यशस्वी झाल्यास भाजपला सत्ता स्थापनेपासून रोखता येईल, असा दावा सय्यद असीम वकार यांनी केला. हे सगळं करण्यासाठी शरद पवार, राहुल गांधी, उद्धव ठाकरेंकडे अतिशय कमी वेळ आहे. त्यामुळे त्यांनी वेगानं हालचाली कराव्यात, अशी पुस्ती वकार यांनी जोडली.