• Sat. Sep 21st, 2024

जामीन रद्द अटक टाळण्यासाठी २५ लाखांची मागणी; पोलिस निरीक्षकासह हवालदाराचं कृत्य, ACBनं ठोकल्या बेड्या

जामीन रद्द अटक टाळण्यासाठी २५ लाखांची मागणी; पोलिस निरीक्षकासह हवालदाराचं कृत्य, ACBनं ठोकल्या बेड्या

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : अटकपूर्व जामीन रद्द झाल्यानंतर अटक न करण्यासाठी, तसेच अन्य मदत करण्यासाठी आरोपींकडून २५ लाख रुपयांची लाच मागणारे मुलुंड पोलिस ठाण्यातील निरीक्षक भूषण दायमा आणि हवालदार रमेश वनकळस यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे. पालिकेच्या अगरवाल रुग्णालयातील बोगस डॉक्टर प्रकरणाचा तपास दायमा यांच्याकडे असून, आरोपींकडून दोन लाखांचा दुसरा हप्ता स्वीकारताना एसीबीने दोघांना पकडले.

काय प्रकरण?

मुलूंड येथील पालिकेच्या एम. टी. अगरवाल रुग्णालयात बोगस डॉक्टरांकडून उपचार, तसेच इतर गैरव्यवहाराबाबत न्यायालयात याचिका करण्यात आली होती. या डॉक्टरांच्या बोगस उपचारांमुळे अनेकांचे बळी गेल्याचा आरोप करण्यात आला होता. याची गंभीर दखल घेत न्यायालयाने हत्या, फसवणूक, महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टीशनर अॅक्ट १९६१ यांसह इतर कलमान्वये मुलुंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. मुलुंड पोलिसांनी याप्रकरणात चंद्रशेखर यादव, सुरेखा चव्हाण आणि सुशांत जाधव या तिघांना अटक केली. यामध्ये अनेक आरोपी असल्याने तसेच काही जण अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात गेल्याने या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक भूषण दायमा यांच्याकडे देण्यात आला होता.

या गंभीर गुन्ह्यात मदत करण्यासाठी, आरोपपत्रामध्ये कलमे कमी करून गुन्ह्याचे प्रमाण कमी करण्यासाठी, अटकपूर्व जामीन रद्द झाल्यास अटक न करण्यासाठी दायमा आणि त्यांच्या मदतीला असलेल्या रमेश वनकळस यांनी आरोपींकडून २५ लाख रुपयांची मागणी केली. इतकी मोठी रक्कम देणे शक्य नसल्याने तडजोडीनंतर ११ लाख रुपये देण्याचे निश्चित झाले. त्याचा पहिला एक लाखाचा हप्ता दायमा यांनी स्वीकारला आणि दुसऱ्या हप्त्यासाठी त्यांनी तगादा लावला.
सात लाचप्रकरणात अडकले ८ पोलिस; जिन्सीच्या PSIने घेतली सर्वात मोठी लाच, ७ महिन्यांतील प्रकरणे
आणखी पैसे द्यायचे नसल्याने आरोपींनी एसीबी कार्यालयात तक्रार केली. त्यानुसार शुक्रवारी लावलेल्या सापळ्यात दोन लाख घेताना दायमा आणि वनकळस या दोघांना पकडण्यात आले. सापळा लावल्याची कुणकुण लागताच त्यांनी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed