• Mon. Nov 25th, 2024

    Rain Updates: पावसाचं कमबॅक, सगळी उणीव भरुन काढणार, हे तीन दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज

    Rain Updates: पावसाचं कमबॅक, सगळी उणीव भरुन काढणार, हे तीन दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज

    पुणे : जुलै महिना अर्धा संपलेला असताना राज्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. सध्या महाराष्ट्रातील काही भागात पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी पावसाची गरज आहे. मात्र, पावसानं चांगलीच दडी मारल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. मात्र आता मोसमी वाऱ्याचा मागील दोन दिवसांपासून जोर वाढला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्यामुळे १९ ते २२ जुलै या काळात राज्यात सर्वदूर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

    मोसमी वाऱ्याचा जोर वाढला आहे. त्यामुळे बाष्पांनी भरलेले ढग पश्चिम घाट ओलांडून पुढे जातील. याच काळात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्यामुळे १९ ते २२ जुलै या काळात राज्यात चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. किनारपट्टीवर मुसळधार, तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.

    Kedarnath Yatra: सह्याद्रीची पोरं हिमालयाच्या मदतीला; दरड हटवण्यासाठी नगरच्या तरुणांनी लावली जीवाची बाजी

    दरम्यान, राज्यातील अनेक भागात पावसाने ओढ दिलीय. त्यामुळं शेतीची कामे मोठ्या प्रमाणात खोळंबली आहेत. पेरण्या लांबल्याने शेतकरी हैराण झालाय. गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत आतापर्यंत राज्यात २१ लाख हेक्टरने कमी पेरा झालेला आहे. पाऊस लांबल्यामुळे अत्तापर्यंत राज्यात केवळ ८३ लाख हेक्टरवर पेरण्यापूर्ण झाल्या होत्या. अजून ६० लाख हेक्टरवर पेरा बाकी असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. राज्यात यंदा चार दिवस उशिरा मॉन्सूनचे आगमन झाले आहे. शिवाय मान्सून सर्वत्र पसरण्यास उशीर झाला. आतापर्यंत एकूण २५ टक्के कमी पाऊस झाल्याने केवळ ५८.६४ टक्के पेरण्या झालेल्या आहेत. अजूनही ४२ टक्के पेरण्या रखडलेल्या आहेत.

    पाण्याच्या प्रवाहात बस अडकली; प्रवासी घाबरले, खिडक्यांमधून बाहेर येत छतावर चढले अन् मग…

    मुंबईसह कोकणात पावसाची हजेरी

    राज्यात गेल्या सात दिवसांपासून फारसा पाऊस न पडल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र शुक्रवारी सकाळपासून कोकण विभागात पुन्हा सक्रिय झालेल्या मान्सूनने दिलासा दिला. कोकण विभागात सक्रिय झालेला मान्सून उर्वरित महाराष्ट्रात कधी दिलासा देतो याची आता प्रतीक्षा आहे. पुढील आठवड्यात मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर किंचित वाढू शकतो, अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

    राज्यामध्ये पुढील पाच दिवसांसाठी दिलेल्या प्रादेशिक अंदाजानुसार मंगळवारपर्यंत कोकण विभागात बहुतांश सर्व ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उत्तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडू शकतो. दक्षिण मध्य महाराष्ट्रात रविवारपासून पावसाची व्याप्ती वाढू शकते. मराठवाड्यातही बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर पूर्व आणि पश्चिम विदर्भातही रविवारपर्यंत बऱ्याच ठिकाणी आणि त्यानंतर बहुतांश सर्व ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोकणाबरोबरच उत्तर महाराष्ट्र आणि सोलापूरपर्यंतच्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वाढल्याचे हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी माणिकराव खुळे यांनी स्पष्ट केले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed