Rupali Chakankar Resignation : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अखेर आपला राजीनामा दिला आहे. नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्या पाद्यपूजन करताना आणि कौतुक करतानाचे व्हिडीओ समोर आल्यानंतर रुपाली चाकणकर या अडचणीत आल्या होत्या. अखेर त्यांना आपल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.
“मी, सौ. रुपाली निलेश चाकणकर,आपणांस विनंतीपूर्वक कळवू इच्छिते की, १५ ऑक्टोबर २०२४ रोजी माझी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची अध्यक्षा म्हणून नियुक्ती झाली होती. माझ्या वैयक्तिक कारणाने मी स्वेच्छेने सदर पदाचा राजीनामा ह्या पत्राद्वारे आपणांस सादर करत आहे. आजवर माझ्यावर विश्वास दाखवून आपण मला सर्वतोपरी सहकार्य केले त्याबद्दल मी आपली व सर्व सहकाऱ्यांची शतशः ऋणी आहे. भविष्यातही आपले असेच सहकार्य राहील असा मला विश्वास आहे. तरी आपण माझा अध्यक्षा, राज्य महिला आयोग ह्या पदाचा राजीनामा स्वीकारावा अशी आपणांस नम्र विनंती आहे”, असं रुपाली चाकणकर यांनी राजीनाम्यात म्हटलं आहे.
रुपाली चाकणकर यांनी अशोक खरात प्रकरणावर 18 मार्चला आपली भूमिका मांडली होती. “शिवनिका संस्थान ट्रस्ट हे महादेव देवस्थानचे ट्रस्ट असून काहीवेळा तिथे सामाजिक कार्यक्रम साजरे होतात, त्यामुळे सामाजिक कामांच्या निमित्ताने आम्ही अनेक जण ट्रस्टच्या कामाशी जोडले गेले होतो.ज्यात समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत.कॅप्टन खरात यांच्या वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला कल्पना नाही,आता जे आरोप होत आहेत त्याबाबत पोलिस निष्पक्षपणे चौकशी करतील,पोलिस तपासावर माझा पुर्ण विश्वास आहे”, अशी पहिली भूमिका रुपाली चाकणकर यांनी मांडली होती. यानंतर रुपाली चाकणकर यांचे आणखी व्हिडीओ समोर आले. यानंतर विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी वाढली.
मुख्यमंत्र्यांचे राजीनाम्याचे निर्देश
विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी वाढल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेतली. या भेटीवेळी त्यांनी राज्य महिला आयोगाच्या वतीने पोलीस महासंचालकांना पत्र दिले. अशोक खरात प्रकरणात सखोल तपास आणि उच्च स्तरीय चौकशी करावी, असे निर्देश त्यांनी पत्राद्वारे दिले. तसेच रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपली भूमिका मांडल्याचं देखील वृत्त काही माध्यमांना दिलं आहे. या भेटीवेळी मुख्यमंत्र्यांनी राजीनाम्याचे निर्देश दिल्याचं वृत्त समोर आलं होतं.
सुनेत्रा पवारांकडे राजीनामा सुपूर्द केल्याची माहिती
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर रुपाली चाकणकर या रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीला गेल्या. यावेळी रुपाली चाकणकर यांनी सुनेत्रा पवार यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. या बैठकीत काय चर्चा होते? बैठकीनंतर रुपाली चाकणकर या राजीनामा देणार का? याकडे सर्वांचं लक्ष होतं. अखेर रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
दरम्यान, ANI वृत्तसंस्थेने याबाबत महत्त्वाचं वृत्त दिलं होतं. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास सांगितले आहे. कॅप्टन अशोक खरात याच्या नाशिक प्रकरणानंतर त्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले, असे सूत्रांनी सांगितले. राज्य महिला आयोगाच्या सूत्रांनुसार, त्या 18 मार्चपासून कार्यालयात येत नव्हत्या आणि महिला आयोगाच्या टीमशी त्यांचा पूर्णपणे संपर्क तुटला होता. त्यांचे सोशल मीडिया त्यांचे वैयक्तिक पथक सांभाळत होते, असं वृत्त ‘एएनआयने’ दिलं होतं.
राजीनाम्यावर रोहित पवार यांची प्रतिक्रिया
रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याच्या वृत्तावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्याचे समजत आहे, याबाबत मुख्यमंत्र्यांचे आभार, परंतु केवळ राजीनामा घेऊन चालणार नाही तर या प्रकरणाच्या तळाशी जाऊन पारदर्शक चौकशी करावी आणि आ. अमोल जी मिटकरी म्हणत असल्याप्रमाणे अजितदादांच्या अपघाताशी या भोंदू बाबाचे कनेक्शन आहे का? याचाही तपास व्हायला हवा, अशी भूमिका रोहित पवार यांनी मांडली आहे.
सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीदेखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. “राजीनामाचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले असतील तर स्वागताचा आहे. मात्र एक खंत आहे की हीच भूमिका राज्याचे खमके नेतृत्व म्हणून राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आणि या पक्षाचे अध्यक्ष सुनेत्रा वहिनींनी घेणं जास्त अपेक्षित होतं. दुर्दैवाने त्यांनी ही संधी गमावली. असो, आमचा लढा चालूच राहील. चाकणकरांना सहआरोपी करून अटक करा”, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे.
