ठाणे अग्निशमन विभागात येत्या काळात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तलावात बुडालेल्या व्यक्तींचा शोध घेतला जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून या दोन मशीन खरेदी करण्याची चाचपणी अग्निशमन विभागाकडून सुरू आहे. या दोन्ही मशीनचा वापर उत्तरेकडील राज्यात पुरामध्ये करण्यात आलेला आहे. त्याचसोबत दैनंदिन घटनांमध्येदेखील याचा उपयोग होणार आहे. या मशीनच्या माध्यमातून तलावात बुडालेल्या व्यक्तींचा अचूक शोध घेतला जाणार आहे. सध्या एखादी व्यक्ती बुडाली की, मृतदेहाचा शोध घेण्यात अनेक तास उलटतात. काही घटनांमध्ये दोन ते तीन दिवस मृतदेह सापडत नाही. यावेळी अशा मशीनची उपयुक्ता सिद्ध होणार आहे. मशीन मानवी देहाचे ट्रॅकिंग स्कॅनरच्या माध्यमातून करते. एकदा का मानवी देहाचे ट्रॅकिंग झाले की मृतदेह पाण्याबाहेर काढणे सुलभ होणार आहे. हे संपूर्ण मशीन टर्किश तंत्रज्ञानावर आधारित आहे.
* मासुंदा तलावात प्रात्यक्षिक
फॅस्टी लाईफ गार्ड मशीनच्या माध्यमातून पुरात अडलेल्या व्यक्तीला केवळ मशीनच्या माध्यमातून किनाऱ्यावर आणता येणार आहे. यासाठी कोणत्याही व्यक्तीला आपला जीव धोक्यात घालून अडलेल्या व्यक्तीजवळ जाण्याची आवश्यकता नाही. ८०० मीटर पर्यंत रिमोटच्या साहाय्याने हे मशीन अडकलेल्या व्यक्तीजवळ पोहचून त्याला सुखरूप किनाऱ्यापर्यंत आणू शकते. मासुंदा तलावात या दोन्ही मशीनचे प्रात्यक्षिक घेण्यात आले असून लवकरच या दोन मशीन ठाणे अग्निशमन विभागात दाखल होण्याची शक्यता आहे.
नागरिकांचा जीव वाचविण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या या दोन्ही मशीनचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले आहे. या मशीन खरेदीसंदर्भात प्रस्ताव विचाराधीन आहे. नागरिकांना चांगली सेवा देण्याच्या दृष्टीने हे तंत्रज्ञान उत्तम असून याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल- गिरीश झळके, मुख्य अग्निशमन अधिकारी, ठाणे महानगरपालिका