नगर जिल्ह्यातील पारनेरचे नीलेश लंके, नगर शहरातील संग्राम जगताप, अकोल्याचे डॉ. किरण लहामटे आणि कोपरगावचे आशुतोष काळे हे आमदार अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत. कर्जत जामखेडचे रोहित पवार व राहुरीचे प्राजक्त तनपुरे हे दोन आमदार मात्र पवारांसोबतच राहिले आहेत. यातील नीलेश लंके यांना पवारांनी खूपच जवळ केले होते. त्यावरून इतर काही नेत्यांची नाराजीही त्यांनी ओढून घेतली होती.
शिवसेनेतून आलेले लंके यांनी पवारांचे मन जिंकले होते. त्यांच्या कामाचा सपाटा आणि अल्पवधित झालेली लोकप्रियता लक्षात घेऊन त्यांना लोकसभेचा उमेदवार म्हणून पुढे आणले होते. भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विरोधात लढण्यासाठी सक्षम उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र, लंके आता अजित पवार यांच्या गटात गेले. त्यामुळे आता पारनेरमधील पूर्वी राष्ट्रवादीत असलेले व सध्या विखे पाटील यांच्यासोबत असलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्याकडे आता पारनेर विधानसभेसाठी पवार यांचे उमेदवार म्हणून पाहिले जाऊ लागले आहे.
झावरे यांनी नुकतीच पवार यांची मुंबईत जाऊन भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून झावरे कुटुंब हे शरद पवार यांच्या सोबत होते. सुजित झावरे यांचे वडील स्व. माजी आमदार वसंतराव झावरे पाटील १९९५ ते १९९९ काँग्रेसचे आमदार होते. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर १९९९ ते २००४ पर्यंत ते पारनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार होते. २००९ मध्ये पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली होती. तरीही ते पक्षासोहत राहिले होते. त्यांच्यासोबत सुजित झावरे राजकारणात सक्रीय झाले. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद त्यांना मिळाले, मात्र पक्षांतर्गत गटबाजीमुळे त्यांना आमदार मात्र होता आले नाही. मधल्या काळात ते विखे पाटील यांच्यासोबत सक्रीय झाले. आता ते पुन्हा राष्ट्रवादीत परतण्याची चिन्हे आहेत.
अकोल्याचे आमदार लहामटे यांनी नाही नाही म्हणत अखेर अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. अकोल्यातील ज्येष्ठ दिवंगत नेते अशोक भांगरे पवार यांचे समर्थक होते. त्यांचे अलीकडेच निधन झाले आहे. त्यांच्या पत्नी गस्ति कारखान्याच्या उपाध्यक्षा सुनीता भांगरे आणि चिरंजीव युवा नेते अमित भांगरे यांनी पवार यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत ठामपणे राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अकोल्यात पवार यांना पर्याय मिळाल्याचे सांगण्यात येते.
नगर शहर आणि कोपरगावमध्ये मात्र, अद्याप पर्याय मिळालेला नाही. नगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आमदार संग्राम जगताप आणि माजी आमदार अरुण जगताप यांचीच मजबूत पकड आहे. हे दोघे म्हणजेच राष्ट्रवादी असेच वातावरण येथे तयार झाले होते. त्यामुळे दुसरी फळीच तयार झालेली नाही. अशा परिस्थितीत येथे पवार यांना पर्याय मिळणे अवघड झालेले आहे. त्यामुळे नगरच्या बाबतीत पवार काय निर्णय घेतात? याकडे लक्ष लागले आहे.
कोपरगावमध्येही अशीच अवस्था आहे. तेथेही अद्याप पर्याय पुढे आलेला नाही. मात्र, भाजपमध्ये असलेले कोल्हे नाराज असल्याचे सांगण्यात येते. आमदार काळे अजित पवार यांच्या माध्यमातून भाजपसोबतच आल्याने कोल्हेंची नाराजी आहे. अलीकडेच शंकरराव कोल्हे यांचे नातू युवा नेते विवेक कोल्हे यांनी गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना सोबत घेत भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात लढविली. त्यानंतर राज्यात या राजकीय घडामोडी झाल्या आहेत. त्यामुळे आता कोल्हे यांच्या भूमिकेकडे लक्ष आहे.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातही पवार यांच्याकडे सक्षम उमेदवार नाही. मागीलवेळी त्यांनी संग्राम जगताप यांनाच पुढे करून निवडणूक लढविण्यास सांगितले होते. स्वत: सह संपूर्ण पक्षाची ताकद उभी करूनही जगताप यांचा सुजय विखे यांनी पराभव केला होता. आता तर विखे, जगताप आणि लंके तिघेही एकत्र आले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादीचा कोण उमेदवार असेल, याची उत्सुकता आहे. शिवाय ही जागा राष्ट्रवादीला जिंकता येत नसल्याने ती काँग्रेसला द्यावी, अशी मागणीही होत आहे. त्यामुळे जागा वाटपात यासंबंधी काय निर्णय होतो? काँग्रेसकडून कोण उमेदवार असेल, याचीही उत्सुकता आहे. विधानसभेच्या आधी लोकसभेची निवडणूक होण्याची शक्यता असल्याने आधी त्याची तयारी करावी लागणार आहे.