पावसामुळे २-३ तास महत्त्वाचे…
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या २-३ तासामध्ये मुंबई आणि ठाण्यातमध्यम ते तीव्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेत घराबाहेर पडावं अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तर कोकणसह पश्चिम किनारपट्टीवर मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून काही भागांत आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा
आज सकाळपासूनच मुंबईसह उपनगरांमध्ये, ठाणे, नवी मुंबईत जोरदार पाऊस सुरू आहे. खरंतर, गेल्या काही दिवसांपासून पाऊस ओसरला होता. त्यामुळे वातावरणात उष्णता जाणवत होती. पण आज पुन्हा एकदा मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. मुंबई, उपनगर परिसरात सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. पश्चिम उपनगरातही पावसाचा जोर दिसून येत आहे.
अधिक माहितीनुसार, सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये पाणी साचलं असून हा सबवे बंद ठेवण्यात आला आहे. तर मुंबईच्या सखल भागातही पाणी साचायला सुरूवात झाली आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, विठ्ठलवाडी आणि बदलापूरमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली तर अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, मालाडसह मुंबई उपनगरातील सर्व भागात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, नवी मुंबईतील, सानपाडा, सीवूड दाराव्हे, खारघर, बेलापूर आणि खांदेश्वर या भागात पावसाने चांगलाच जोर धरला असून नवी मुंबईसह पनवेल आणि रायगडमध्येही तुफान पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अशात हवामान खात्याकडून राज्यात पुढचे ५ दिवस पावसाचे असल्याचा अंदाज बांधण्यात आला आहे.
राज्यात पुढचे ५ दिवस पावसाचे…
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसाार, राज्यात पुढचे ५ दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज असून मराठवाड्यासह इतर काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.