प्रवासी मच्छिंद्र पाटील गोवा-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसमधून प्रवास करत असताना त्यांच्या जेवणात नख आढळून आले. प्रवाशांनी हा प्रकार गाडीतील तिकीट तपासणीसांच्या निदर्शनास आणून दिला. तसेच, समाज माध्यमांवर याबाबत तक्रार करत ‘आयआरसीटीसी’ला टॅग केले. मुंबई-शिर्डी आणि मुंबई-सोलापूर ‘वंदे भारत’मध्ये थंड नाश्ता व जेवण देण्यात येत असल्याच्या तक्रारदेखील ‘आयआरसीटीसी’कडे आल्या आहेत.
‘या तक्रारींची शहानिशा केल्यानंतर गोवा ‘वंदे भारत’मध्ये खाद्यपदार्थ पुरवणाऱ्याला २५ हजारांचा, तर शिर्डी ‘वंदे भारत’मधील कंत्राटदारांला ५० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सध्या जेवण-नाश्त्याच्या दर्जाबाबत तक्रारी नाहीत. मात्र, जेवण थंड असणे, विलंबाने मिळणे, अयोग्य सेवा अशा प्रवाशांच्या तक्रारी आहेत’, असे ‘आयआरसीटीसी’कडून सांगण्यात आले.
‘वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये पॅण्ट्री डबा नाही. मात्र खाद्यपदार्थ गरम आणि थंड करण्यासाठीची सुविधा उपलब्ध आहेत. तयार खाद्यपदार्थ प्रवाशांना वाटेपर्यंत थंड होत असल्याची बाब समोर आली आहे. प्रवाशांना गरमागरम खाद्यपदार्थ देण्यासाठी वेष्टनात बदल करण्यात येणार आहे’, असेही ‘आयआरसीटीसी’तील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबई-गोवा, मुंबई-शिर्डी, मुंबई-सोलापूर, मुंबई सेंट्रल-गांधीनगर आणि नागपूर-बिलासपूर मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. मुंबईतून धावणाऱ्या चारही गाड्यांमध्ये सरासरी ८० टक्क्यांहून अधिक प्रवासी प्रतिसाद लाभला आहे.
सेवा सुधारण्यासाठी चार उपाय
– खाद्यपदार्थ गरम राहण्यासाठी वेष्टनांमध्ये बदल करण्यात येत आहे.
– खाद्यपदार्थ बनवण्याच्या ठिकाणी ‘आयआरसीटीसी’च्या अधिकाऱ्यांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात आली आहे.
– अधिकाऱ्यांकडून वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये अचानक भेट देऊन सेवेबाबत खातरजमा करण्यात येत आहे.
– दर महिन्याऐवजी प्रत्येक आठवड्याला खाद्यपदार्थांची तपासणी करण्यात येत आहे.
‘वंदे भारत’मध्ये मिळणारे खाद्यपदार्थ
– कोथिंबीर वडी, भडंग, थालिपीठ, साबुदाणा वडा, शेगाव कचोरी, पनीरची भाजी, चपाती, डाळ व भात, चिकन, दही, बटाटा किंवा मिक्स सुकी भाजी.
वंदे भारत एक्स्प्रेसमधील खाद्यपदार्थांची तक्रार केल्यानंतर पदार्थाच्या दर्जा आणि सेवेत सुधारणा होण्यास सुरुवात झाली आहे. हात धुण्यासाठी सॅनिटायझर, दही, एकल वापरायोग्य चमचे व्यवस्थित मिळत आहेत. मात्र सुधारणेबाबत अद्याप बरीच अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया हिमांशू मुखर्जी या प्रवाशाने दिली.