समोर आलेला मृत्यू सुदैवाने टळला; पण आम्हाला हादरा बसल्याचे प्रवाशांनी सांगितले. अपघातानंतर बुधवारी सकाळी जखमी रुग्णांनी ‘देवीच्या आशीर्वादामुळे बचावलो,’ अशी भावना व्यक्त करून बसचालकाच्या समयसूचकतेवरही बोट ठेवले. धुक्यात वाट न दिसल्याने बस थेट चारशे फूट दरीत कोसळल्याची घटना दुर्दैवी आहेच; पण ‘स्टिअरिंग’ पक्के धरून ठेवत गाडीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला.
अपघातापासून बचाव होण्यासाठी चालकाने स्वत:च्या जिवावर खेळून बसचे स्टेअरिंग धरून ठेवले. या घटनेत जखमी महिलेचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला, तर चालक गंभीर जखमी आहे. ‘या अपघातानंतर जीव वाचला असला, तरी मृत्यू जवळून बघितल्याने हादरलो,’ असे जखमी प्रवाशांनी ‘मटा’ला सांगितले.
नावे आधी कपाळावर, मग हातावर
वणीत प्राथमिक उपचार झाल्यावर रुग्णांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे घाईघाईत कर्मचाऱ्यांनी नावांच्या चिठ्ठ्या रुग्णांच्या थेट कपाळावरच चिकटवल्या. त्यावर काहींनी आक्षेप घेतला. वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यात आली. त्यानंतर कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आल्या. कपाळावरील चिठ्ठ्या हातावर चिकटवण्यात आल्या.
खामगाव ते नंदुरबार गाडी होती. रात्री जेवण करून झोप व्यवस्थित झाली. साडेसहाला निघालो. दहा-बारा मिनिटांत गणपती पॉइंट म्हणून ठिकाण होतं. धुकं जास्त होतं. वळण घेताना चालकाच्या लक्षात आलं नसेल. धुक्यामुळे गाडीचा अपघात झाला. बसमध्ये २२ प्रवासी होते.
– पुरुषोत्तम टिकार, वाहक
मी स्टेअरिंग पक्के पडकल्याचं आठवतं; पण बस धडकल्यानंतरचं मला काहीच आठवत नाही.
– गजानन टपके, चालक