खातेवाटपावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या खातेवाटपावर मंगळवारी एकमत होऊ शकले नाही. दोन खात्यांवरून तिढा निर्माण झाला असून, मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप लांबणीवर पडल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर
बच्चू कडू यांनी बुधवारी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, सुरुवातीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्यावर खापर फोडत आम्ही उद्धव ठाकरेंची साथ सोडली, असे शिवसेनेचे आमदार सांगत होते. पण आता राष्ट्रवादीच भाजपसोबत आल्याने पेच निर्माण झाला आहे. राजकारणात अशा गोष्टी नेहमी होत असतात. मी गेल्या १५-२० वर्षांमध्ये जेवढं शिकलो नसेन तितकं मला गेल्या पाच वर्षांमध्ये शिकायला मिळाले आहे. देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करणार नाही, असे त्रिवार सांगितले होते. पण आता त्याच राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घ्यावे लागले आहे. आता हे आदेश वरुन आले आहेत का, लोकसभा निवडणुकीचं गणित जमवण्यासाठी या सगळ्या गोष्टी घडल्या असाव्यात. सध्या लोक संख्येकडे पाहतात. त्यामुळे इच्छा नसताना काही गोष्टी कराव्या लागतात, असे बच्चू कडू यांनी म्हटले.
अजित पवारांना अर्थ खाते देण्यास विरोध
यावेळी बच्चू कडू यांनी अजित पवारांना अर्थखाते देऊ नये, ही आमची भूमिका कायम असल्याचे सांगितले. आम्ही दुसऱ्यांच्या ग्लासमधून पाणी पिणारे नाही. आमची स्वत:ची औकाद आहे, अस्तित्व आहे. त्यामुळे काहीही झालं तरी मी जास्त लोड घेत नाही. राजकारणात काही मर्यादा असतात. गेल्या वर्षभरापासून विस्तार होणार-होणार, असे सांगितले जात होते. आता विस्तार झाला तर तिसऱ्या नंबरवर असणाऱ्याला पहिलं स्थान देण्यात आले. पहिल्याला डोक्यावरं घेतलं होतं, आता दुसरा आल्यानंतर त्याला खाली टाकले. ही परिस्थिती सुधारण्याची गरज आहे. मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश होणार की नाही, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही कल्पना होती का हे माहिती नाही. अजित पवारांना अर्थखाते देण्यास माझी काही हरकत नाही. पण अजित पवार यांच्याकडून भविष्यात निधीवाटपात ढवळाढवळ झाल्यास ते खपवून घेणार नाही, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.