पावसाळ्यामुळे पूल आणि पायऱ्यावर पाणी पडते. पाण्यामुळे पायऱ्यांवर चिटकवण्यात आलेले स्टिकर निघत आहेत. यामुळे पायऱ्या निसरड्या झाल्या असून पाणी आणि स्टिकरवरून घसरून प्रवाशाना इजा होण्याची शक्यता आहे. यामुळे स्टिकर पूर्णपणे काढून टाकावे किंवा नव्याने स्टिकर चिटकवण्यात यावे, अशी मागणी प्रवाशांची आहे.
मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अनेक रेल्वे स्थानकाच्या पुलाच्या पायऱ्यावरील स्टिकर यापूर्वी देखील वादाचे कारण ठरले होते. इंग्रजी, हिंदी आणि मराठी तीन भाषांमध्ये स्टिकर चिटकवण्यात आले आहेत. मात्र या स्टिकरमधील मराठी आणि हिंदी भाषांतर अत्यंत चुकीचे असल्याने प्रवाशांकडून तीव्र नाराजी दर्शवली होती. प्रवाशांच्या नाराजीनंतर मराठी आणि हिंदी भाषेतील चुकीचे अर्थबोध होणारे मोजके स्टिकर काढून टाकण्यात आले. मात्र अनेक स्थानकांतील पुलाच्या पायऱ्यांवर स्टिकर असल्याने पावसाळ्यात पुलावरील अस्वच्छतेचे कारण ठरत आहेत.
प्रवाशांमध्ये संताप
मुंबई रेल्वे विकास महामंडळाने बांधलेल्या नव्या पुलावर संपूर्ण पायऱ्यांची रंगरंगोटी करून पुलाचे सुशोभिकरण करण्यात येत आहे. मात्र सीएसएमटीतील दादर दिशेच्या पायऱ्या पाहून प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे. यामुळे सुशोभिकरणासाठी स्टीकरचा वापर करू नये, असा ही सूर प्रवाशांमधून उमटत आहे.