• Sat. Sep 21st, 2024
मुलाचं लग्न उरकलं, तासाभरात कार्यकर्त्याच्या घरी लग्नाला, शेट्टींच्या ‘टायमिंग’ने नवरदेव खूश

कोल्हापूर : ‘शेतकऱ्यांचा नेता’ म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांची ओळख. अगदी दोन दिवसांपूर्वीच म्हणजे रविवारी राजू शेट्टी यांचा मुलगा सौरभ शेट्टी विवाहबंधनात अडकला. सौरभचा विवाह सोहळा अगदी साध्या पद्धतीने पार पडला. नेता म्हटलं की त्यांचा जनसंपर्क मोठा असतो. पण फार लोकांना उपस्थितीचा आग्रह न धरता मोजक्या लोकांमध्ये राजू शेट्टींनी लेकाचं लग्न उरकलं. अन् काही तासांतच तिथून थेट कार्यकर्त्याच्या लेकाच्या लग्नात हजेरी लावली. तिथे वधू वरांस त्यांनी आशीर्वाद दिले आणि लग्नात जेवण देखील केलं. यामुळे राजू शेट्टी यांचं कार्यकर्त्यांप्रति असलेलं प्रेम आणि जिव्हाळा अधोरेखित झाला.

माजी खासदार राजू शेट्टी यांचा मुलगा सौरभ शेट्टी याचा विवाह सोहळा रविवारी अगदी साधेपणाने पार पडला. राजू शेट्टी हे चळवळीतील नेते… यामुळे त्यांच्यासोबत असलेले त्यांचे कार्यकर्ते हे त्यांना त्यांच्या परिवारापेक्षाही जास्त जवळचे. सौरभ शेट्टी यांचं लग्न रविवारी असतानाच त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि संघटनेचे जिल्हा सरचिटणीस असलेले शिवाजी पाटील यांचा मुलगा विनय याचा विवाह देखील वडगाव येथील हिरा हॉलमध्ये त्याचवेळेस होता. या लग्नात राजू शेट्टी यांनी हजेरी लावावी, असा हट्ट शिवाजी पाटील यांचा होता. मात्र एका बाजूला आपल्या मुलाचं लग्न आणि दुसऱ्या बाजूला आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मुलाचं लग्न अशा विवंचनेत राजू शेट्टी सापडले.

अजितदादांच्या नव्या मंत्र्यांना बंगल्यांचं आणि दालनांचं वाटप, वाचा संपूर्ण लिस्ट!
मात्र त्यांनी आपल्या मुलाचं लग्न उरकून या कार्यकर्त्याच्या लेकाच्या लग्नात हजेरी लावलीच. शेट्टी यांच्या मुलाचा लग्न सोहळा मर्यादित लोकांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने पार पडला तर संघटनेचे बहुसंख्य कार्यकर्ते हे शिवाजी पाटील यांच्या मुलाच्या लग्नात गेले होते.

पाटलांच्या लग्नात राजू शेट्टी नसल्याची उणीव जाणवत होत होती. येणारा पाहुणा ‘साहेब येणार आहेत की नाही?’ असे विचारत होता. साहेब आल्याशिवाय मी जेवणार नाही, असं शिवाजी पाटील पाहुण्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगत होते.

विखेंच्या लेकाची धडाकेबाज कामगिरी, पहिल्याच टर्ममध्ये बाजी, देशपातळीवर कामाचा गवगवा
राजू शेट्टी यांनी आपल्या मुलालं लग्न उरकून, पाहुण्यांना भेटून गडबडीतच गाडीत बसले आणि थेट वडगावमध्ये पोहोचले. पाटील यांच्या मुलाच्या लग्नात ते हजर झाले आणि शुभाशीर्वाद देखील दिले. कार्यकर्त्यांच्या आग्रहाचा मान ठेवून त्यांनी जेवणही केलं. त्यामुळे शेट्टी यांचे निष्ठावंत कार्यकर्ते शिवाजी पाटील आनंदित झाले. तर नवरदेवाच्या आनंदाला पारावरच उरला नव्हता. इतकी वर्ष मी साहेबांसोबत काम केल्याच्या निष्ठेचं फळ मला मिळालं, अशी भावना काळे यांनी व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed