गंगापूर आणि कॉलेजरोडवरील वाहतूक समस्येसंदर्भात ‘मटा’ने आवाज उठवल्यानंतर अतिरिक्त वाहतूक अंमलदार नेमण्याचा निर्णय झाला. तर, महापालिकेतही रस्ता सुरक्षा समितीची बैठक होत विविध उपाययोजनांना ‘हिरवा कंदील’ दर्शवण्यात आला. त्यानंतर पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शहरातील बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार वाहतूक उपायुक्त मोनिका राऊत आणि सहायक आयुक्त डॉ. सचिन बारी यांनी शहरातील चारही वाहतूक पथकांना कठोर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार गत तेरा दिवसांत शहरात विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्यांसह ट्रिपलशीट फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यातून पंचवीस लाखांचा दंड वसूल करुन वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी प्रबोधन करण्यात आले आहे.
८८ परवाने रद्द
फक्त विनाहेल्मेट आणि ट्रिपलशीटच नव्हे, तर सर्व प्रकारच्या वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. गंभीर बाब म्हणजे, अनेक ठिकाणी बेशिस्तरित्या पार्किंग, वाहने चालविण्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे थेट परवाना रद्द करण्यासंदर्भात कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार वाहतूक शाखेने जून महिन्यापर्यंत ६७ आणि १० जुलैपर्यंत ८८ चालकांचे वाहन चालविण्याचे परवाने रद्द अथवा निलंबित करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर केले आहेत.
कारवाई : वाहने : दंड वसूल
विनाहेल्मेट : ४,३५९ : २१ लाख ७९ हजार ५०० रुपये
ट्रिपलसीट : ४५४ : ४ लाख ५४ हजार रुपये
विनाहेल्मेट, ट्रिपलसीटसह वाहतुकीचे इतर नियम मोडणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येत आहे. आयुक्तालयातील चारही वाहतूक पथकांना त्यासंदर्भात सूचना करून कारवाईची नियमित माहिती घेतली जात आहे. नागरिकांनी सर्व प्रकारचे नियम पाळल्यास शहरातील वाहतुकीच्या समस्येचे बऱ्यापैकी निवारण होईल. त्यानुसार वाहतूक विभागाची कारवाई सुरू आहे.- डॉ. सचिन बारी,सहायक आयुक्त, वाहतूक