नंदुरबारमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवजात बालकाला सोडून आईने पलायन केले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या महिलेचा शोध गेल्या काही दिवसांपासून सुरु होता. अखेर या प्रकरणात आता गुन्हा दाखल झाला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
महेश पाटील, नंदुरबार : मानवतेला काळिमा फासणारी एक हृदयद्रावक घटना जिल्हा रुग्णालयात उघडकीस आली आहे. एका महिलेने नवजात मुलीला जन्म दिल्यानंतर तिचे संगोपन आणि पालनपोषण न करता तिला रुग्णालयातच सोडून पळ काढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ५ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी रकसवाडे प्राथमिक आरोग्य केंद्रातून एका गरोदर महिलेला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकारी डॉ. रिजवान शहा यांनी तपासणी केली असता संबंधित महिला ९ महिन्यांची गरोदर असल्याचे स्पष्ट झाले. तातडीने तिला प्रसूती कक्षात हलवण्यात आले.
दुपारी ४:१२ वाजता त्या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र जन्मानंतर बाळाची प्रकृती नाजूक असल्याने तिला तातडीने विशेष निगा विभागात (काचेच्या पेटीत) दाखल करण्यात आले. तर संबंधित मातेला पुढील उपचारासाठी दुसऱ्या वॉर्डमध्ये ठेवण्यात आले.
दुसऱ्या दिवशी, ६ फेब्रुवारीला सकाळी बाळाला दूध पाजण्यासाठी तिची आजी रुग्णालयात आली होती. मात्र दुपारनंतर बाळ रडत असल्याने परिचारिकांनी आईचा शोध घेतला असता ती वॉर्डमध्ये आढळून आली नाही. सायंकाळी पुन्हा तपासणी केली असता ना आई दिसली ना आजी. रात्रीपर्यंतही ती महिला परत न आल्याने संशय बळावला.
रात्रपाळीतील कर्मचाऱ्यांनीही तपास केला असता संबंधित महिला पूर्णतः बेपत्ता असल्याचे स्पष्ट झाले. अखेर या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली. तपासात संबंधित महिलेची ओळख अशी पटली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, आईने स्वतःहून नवजात मुलीच्या संगोपनासाठी पुन्हा संपर्क साधलेला नाही. त्यामुळे “जन्म देऊन लेकराला सोडून पळून जाणे” या गंभीर प्रकारावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, संबंधित मातेचा शोध सुरू आहे.
दरम्यान, निरागस नवजात मुलगी रुग्णालयात उपचार घेत असून तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेने समाजमन हेलावून गेले असून, आईच्या या कृत्यावर तीव्र संताप व्यक्त होत आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा