स्पा सेंटरच्या आड सुरु असणाऱ्या चुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी आता स्पा सेंटरसाठी नव्या नियमावली बनवणार असल्याची घोषणा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज विधान परिषदेत केली.
“अशाप्रकारचे स्पा वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रात चालू आहेत. या गुन्ह्यांचे प्रमाण खूप वेगाने वाढत आहे. वेगवेगळ्या नावाने कार्यरत असणारी अनेक मंडळी स्पा चालवत आहेत. यामध्ये प्रियंका महाल, रहीम, शीतल मंगेश, अनुष पांडे यांसारख्या लोकांची संघटीत साखळी चालत आहे. पण मला यातून हे विचारायचं आहे की, आज विशिष्ट सूत्रधारांच्या मालमत्तांची चौकशी करुन आपण अशा स्पा चालवणाऱ्या या ग्रुप्सवर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करण्याचा गृह विभागाचा काही विचार आहे का?”, असा सवाल अमित गोरखे यांनी केला.
‘किती स्पा सेंटरवर कारवाई केली?’
“या प्रकरणात जे मास्टमाईंड आहेत त्यांना तुरुंगात डांबून गुन्हेगारी साखळी शासन कधी मोडून काढणार आहे? गेल्या तीन वर्षात राज्यात किती स्पा सेंटरवर छापे टाकले? त्यातून किती गुन्हे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा अंतर्गत दाखल झाले, याची माहिती मला मिळेल का? विशेषता पुण्याच्या ज्या विमाननगर येथील स्पा सेंटरवर कारवाई करताना ज्या महिलेचा मृत्यू झाला त्या प्रकरणात केवळ मॅनेजरवर कारवाई झाली. पण मूळ मालक आणि तिथे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर जबाबदारीची निश्चिती म्हणून कारवाई करणार आहात का? याचंही विश्लेषण हवं आहे. सध्या स्पा सेंटर केवळ शॉप अॅक्ट म्हणजेच वेलनेस सेंटरच्या नावाखाली शॉप अॅक्टचे लायसन्स मिळतं, जे किराणा दुकानाला दिलं जातं, ते थांबवण्यासाठी शासन स्पा व्यवसायासाठी स्वतंत्र आणि कडक नियमावली आणणार आहे का?”, असादेखील महत्त्वाचा सवाल अमित गोरखे यांनी केला.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं उत्तर
“अमित गोरखे यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उत्तर दिलं. “पुण्याच्या विमाननगरला जी कारवाई केली ती पोलीस विभागाच्या तत्परतेने कारवाई झाली. ज्यावेळेस अशा स्पा सेंटरवर आपण कारवाई करतो तेव्हा तिथे परदेशी नागरीक आढळतात. काही प्रमाणात तिथे मानवी तस्करीचे गुन्हेगार आहेत त्यांच्याकडून महिलांचे शोषण होतं. स्पा सेंटरला गुमास्ताचे लायसन्स मिळाले की ते व्यवसाय करत असतात. याचं प्रमाण पाहता आपण उत्तरात आकडेवारी दिलेली आहे”, असं योगेश कदम सांगतात.
‘समिती स्थापन, अहवाल मागवला’
“या प्रकरणातील गुन्ह्यांची व्याप्ती पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी महत्त्वाचे निर्देश दिले होते. स्पा सेंटर्सना परवानगी देण्याबाबत नगरविकास आणि ग्रामविकास विभागाला सोबत घेऊन एक समिती स्थापन केली होती. स्पा सेंटरला परवानगी देत असताना काय नियमावली असायला हवी याचा अहवाल मागवला आहे. मुख्यमंत्र्यांकडे अहवाल लवकरच सादर होईल. आम्ही नियमावली तयार करतोय. यापुढे स्पा सेंटरला गृह विभागाची परवानगी लागेल. स्पा सेंटर चालवताना कुठले निकष असले पाहिजेत याबाबत नियमावली असेल. तसेच स्पा सेंटरमध्ये काम करणाऱ्या महिला कुठून आल्या आहेत? याची देखील माहिती असणं आवश्यक आहे. तसेच आरोग्य विभागाकडूनही अहवाल मागवला आहे”, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.
नेमकी अंमलबजावणी कधी होणार?
“पुढच्या तीन-चार महिन्यात ही नियमावली तयार होईल. त्यानंतर त्याबाबत अंमलबजावणी केली जाईल. यामध्ये आम्ही अजून सूचना केल्या आहेत. आम्ही विमाननगरला कारवाई केली तेव्हा थायलंडच्या महिला तिथे होत्या. त्यामुळे या महिला कशा आल्या, त्यांचे एजंट कोण आहेत, त्या एजंटपर्यंत पोहचा. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आपण मानवी तस्करीचा गुन्हा दाखल करतोय. पण या गोष्टी मुळापासून नष्ट केल्या पाहिजेत. विमाननगर प्रकरणात जो मॅनेजर होता तोच एजंट होता. त्यामुळे त्याच्यावर कारवाई झाली. आगामी काळातही जे एजंट महिलांना विदेशातून किंवा देशाच्या इतर भागातून महिलांना आणतील त्यांच्यावर गंभीर कारवाई व्हायला हवी”, असा महत्त्वाचा मुद्दा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मांडला.
