• Sun. Jun 14th, 2026
    Pune Crime : कबुतर चोरीचा संशय, मध्यरात्री टोळक्याकडून पाठलाग; हातपाय बांधून बेदम मारहाण, 19 वर्षीय रुपेशचा जीव गेला

    पुण्यातील वानवडी परिसरात कबुतर चोरीच्या संशयावरून १९ वर्षीय तरुणाची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली आहे. ‘चोर-चोर’ ओरडत टोळक्याने तरुणाचे हातपाय बांधून त्याला बॅटने मारहाण केली.

    पुण्यातील वानवडीत कबूतर चोरीच्या संशयावरून तरुणाची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    स्नेहल निमगिरे, पुणे : १८ मार्चची पहाट… सर्वत्र काळोख आणि ४ ते ५ जणांच्या टोळक्याकडून अचानक सुरू झालेला १९ वर्षीय तरुणाचा जीवघेणा पाठलाग. वानवडी परिसरात घडलेली ही घटना अक्षरशः अंगावर शहारे आणणारी आहे. ५ जणांच्या टोळक्याने तरुणाला गाठले आणि बॅटने, लाथा-बुक्क्यांनी प्रचंड मारहाण केली. या मारहाणीनंतर तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

    नेमकी घटना काय?

    कबुतर चोरीच्या संशयावरून १९ वर्षीय रुपेश शिंदे याला पकडून जमावाने एवढ्या भीषण पद्धतीने मारहाण केली की, त्यातच त्याचा मृत्यू झाला. १८ मार्चच्या पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास रुपेश आणि त्याचा मित्र अजय दुचाकीवरून जात होते. हडपसरमधील शंकर मठाजवळ थांबल्यानंतर ते पवार एन्क्लेव्ह परिसरातील कॅनाललगत असलेल्या मोकळ्या जागेत कबुतरांच्या पिंजऱ्याजवळ गेले. याच क्षणी श्वानांच्या भुंकण्याचा आवाज आला आणि काही सेकंदांतच परिस्थिती बदलली.

    हातपाय बांधून रुपेशला मारहाण

    “चोर… चोर…” असा आरडाओरडा करत काही जणांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. घाबरलेल्या रुपेशने जीवाच्या आकांताने पळ काढला. पण मुख्य रस्त्यावरील जिनमाता मोटर्ससमोर तो धावताना खाली पडला… आणि इथेच टोळक्याने त्याला गाठले. त्याचे हातपाय बांधले आणि त्यानंतर रुपेशला मारहाण सुरू केली. काही काळ त्याला बांधून ठेवून निर्दयी मारहाण केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

    दवाखान्यात बेबनाव

    या मारहाणीत रुपेश गंभीर जखमी झाला. पहाटे त्यालाच मारहाण करणाऱ्यांनी दवाखान्यात दाखल केले; मात्र ‘अपघात झाला’ अशी खोटी माहिती देऊन हा प्रकार झाकण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दरम्यान, रुपेशसोबत असलेले त्याचे मित्र घटनास्थळावरून पळून गेले होते. त्यांनी सकाळी साडेनऊच्या सुमारास कुटुंबीयांना सर्व प्रकार सांगितला. तोपर्यंत दवाखान्यातून फोनही आला होता. वडिलांनी धाव घेतली, पण तोपर्यंत उशीर झाला होता… रुपेशचा मृत्यू झाला होता.

    गुन्हा नोंद व आरोपींना अटक

    या घटनेनंतर कुटुंबीयांनी वानवडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून काही आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. मात्र, फक्त संशय आला म्हणून एका तरुणाला पकडून बेदम मारहाण करून जीव घेतल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा