अजित पवार यांच्या शपथविधीच्यावेळी डॉ. लहामटे त्यांच्यासोब होते. त्यापूर्वी तयार करण्यात आलेल्या अनेक कागदपत्रांवर त्यांनी सह्याही केल्या. मात्र, दुसऱ्या दिवशी लहामटे ज्येष्ठ नेते पवार यांच्याकडे परतले. मुंबईतील सभेला त्यांनी उपस्थितीही लावली. आपल्याकडून फसवून सह्या करून घेतल्याचे ते सांगत होते. तर कोपरगावचे काळे परदेशात असल्याने त्यांची भूमिका स्पष्ट होत नव्हती. तेव्हापासून लहामटे यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू झाले होते.
अजित पवार यांनी ही जबाबदारी नगरचे विळद येथील त्यांचे विश्वासू कार्यकर्ते बाळासाहेब जगताप यांच्यावर सोपविली. जगताप यांनी तडक अकोले गाठले. डॉ. लहामटे यांची समजूत काढली. मात्र, ते सहजासहजी तयार होत नव्हते. त्यामुळे जगताप अकोल्यातच तळ ठोकून थांबले. त्यांनी विविध माध्यमांतून लहामटे यांच्याशी संपर्क साधण्याचा, त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला, मात्र लहामटे त्यांना टाळत होते. एवढेच काय, त्यांची भेट आणि संवादही ते टाळू लागले. घरी न थांबता अज्ञात ठिकाणी थांबू लागले.
अखेर शनिवारी रात्री जगताप यांनी डॉ. लहामटे यांना गाठलेच. त्यांना अजित पवार यांचा निरोप देण्यात आला. त्यांना रात्रीच मुंबईला नेण्यात आले. तेथे मध्यरात्रीच्या सुमारात त्यांची अजित पवार यांच्याशी भेट घडवून आणण्यात आली. अजित पवार यांच्यासोबत त्यांची चर्चा झाली. अकोल्यात काय विकास कामे करायची, याचा आराखडा तयार करण्यास त्यांना सांगण्यात आले. विशेष म्हणजे आणखी काही कागदपत्रे तयार करण्यात येत असून त्यावरही डॉ. लहामटे यांच्या सह्या घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता लहामटे कायदेशीररित्याही अजित पवार यांच्यासोबत बांधले गेले असल्याचे सांगण्यात आले.
नगर जिल्ह्यातील कोपरगावचे आमदार आशुतोष काळे सध्या कुटुंबासह अमेरिकेत आहेत. त्यांच्याकडूनही अजित पवार यांना पाठिंबा असल्याचे प्रतिज्ञापत्र करून घेतल्याचे सांगण्यात येते. एक दोन दिवसांत ते परत येणार आहेत. त्यावेळी ते अजित पवार यांच्यासोबत असल्याची भूमिका स्पष्ट करतील, असेही सांगण्यात आले. त्यामुळे आता नगर जिल्ह्यातील रोहित पवार आणि प्राजक्त तनपुरे हे दोघे वगळता राष्ट्रवादीचे चार आमदार अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत.
केवळ आमदारच नाही, तर अन्य पदाधिकारीही अजित पवार यांची भेट घेत आहेत. नगरचे माजी आमदार अरुण जगताप, चंद्रशेखर घुले, सीताराम गायकर यांच्यासह प्रमुख नेत्यांनी आजपर्यंत अजित पवार यांची भेट घेतल्याचे सांगण्यात येते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके मात्र ज्येष्ठ नेते पवार यांच्यासोबतच आहेत. त्यामुळे अजित पवार गटाकडून जिल्ह्यासाठी दुसरा अध्यक्ष दिला जाऊ शकतो. ही जबाबदारी कोणावर असेल, याचीही उत्सुकता आहे.