• Sat. Sep 21st, 2024
विक्रोळी उड्डाणपूलाचे काम संथगतीने, रखडपट्टीमुळे ४१ कोटी वाढीव खर्च

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटक ओलांडताना होणारे अपघात टाळण्यासाठी फाटक बंद करून उड्डाणपुलाची उभारणी मुंबई महापालिका आणि मध्य रेल्वेकडून सुरू झाली. मात्र तीन वर्षे उलटूनही पुलाचे काम संथगतीने सुरू असल्याने ते रखडले आहे. पुलाचे काम सुरू झाल्यानंतर बदलण्यात आलेला आराखडा आणि करोनामुळे काही महिने बंद राहिलेले काम यासह अन्य मुद्दे रखडपट्टीसाठी कारणीभूत ठरले आहेत. त्यामुळे प्रस्तावित ३७ कोटींचा खर्च तब्बल ४१ कोटींहून अधिक रुपयांनी वाढून ७९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

मार्च २०१८मध्ये मुंबई महापालिकेने उड्डाणपुलाच्या कामाचे कार्यादेश काढले आणि एका कंपनीला कामही दिले. त्यावेळी या कामाची मूळ किंमत ३७ कोटी ०६ लाख २४ हजार रुपये होती. पावसाळा सोडून १८ महिन्यांत पुलाचे काम पूर्ण करण्याची अट घालण्यात आली. मे २०१८मध्ये पुलाच्या कामाला सुरुवात झाली. मात्र जलद बांधकामासाठी पुलाच्या आराखड्यात फेरफार करण्यात आले.

राज्याचं पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून; ३ आठवडे चालणार कामकाज, यावेळी कोण असणार टार्गेट?
आयएस मानांकनाच्या नवीन प्रणालीमुळे आराखड्यात बदल करतानाच त्याच्या मंजुरी प्रक्रियेसही विलंब झाला आणि पुलाची रखडपट्टी सुरू झाली. साधारण २०२०च्या सुरुवातीला पुन्हा महत्त्वाच्या कामांना सुरुवात झाली. मात्र, कोरोनाकाळात पुन्हा कामाची गती मंदावली आणि ही रखडपट्टी अद्यापही सुरूच आहे. त्यामुळे पुलाचा खर्च ७९ कोटी २० लाख ३९ हजार ७५८ रुपयांपर्यंत पोहोचला असून ४१ कोटी रुपयांहून अधिकची वाढ यात झाली आहे.

रेल्वे रुळावरील पुलाचे काम मध्य रेल्वेकडून आणि रेल्वे हद्दीबाहेरील पूर्व-पश्चिमेकडील कामाची जबाबदारी मुंबई महापालिकेच्या पूल विभागावर आहे. पालिकेच्या पूल विभागाकडून उड्डाणपुलाच्या पूर्व दिशेला गर्डरचे बहुतांश काम झाले आहे, तर पश्चिमेला गर्डर बसवण्याच्या कामाला पावसाळ्यानंतर सुरुवात होईल, अशी माहिती पालिकेतील अधिकाऱ्यांनी दिली. रेल्वे हद्दीतील पुलाच्या कामासाठी मध्य रेल्वेने गर्डर तयार ठेवले आहेत. मात्र ते कामही पावसाळ्यानंतरच होण्याची शक्यता आहे. यासाठी रेल्वेला विशेष मेगाब्लॉकही घ्यावे लागतील. हा संपूर्ण उड्डाणपूल मे २०२४पर्यंत खुला करण्याचे उद्दिष्ट असले तरीही ते वेळेत पूर्ण होण्याची शक्यता धूसरच आहे.

पाच किलोमीटरचा वळसा

विक्रोळी पूर्व-पश्चिमेला जोडणारा हा उड्डाणपूल अद्यापही पूर्ण न झाल्याने विक्रोळी पश्चिमेकडून कांजुरमार्गला जावे लागते. तेथून गांधीनगर मार्गे पूर्व द्रुतगती मार्गावर येऊन कन्नमवार नगरला जावे लागते. यासाठी तब्बल पाच किलोमीटरचा वळसा घालावा लागतो. त्यामुळे उड्डाणपूल लवकरात लवकर पूर्ण होण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed