कल्याण-डोंबिवली परिवहनच्या ताफ्यात १४१ बस असल्या तरी देखभाल-दुरुस्तीअभावी यातील ५१ बस आगारात धूळ खात पडून आहेत. तर, ९० बस ३८ मार्गांवर चालवल्या जात असून यातून पालिकेला दररोज पाच ते सहा लाखांचे उत्पन्न मिळते. यातील १० व्होल्व्हो वातानुकूलित बस आहेत. तर, केंद्र सरकारसह राज्य सरकारकडून प्राप्त झालेल्या अनुदानातून पालिकेने २०९ पर्यावरणपूरक बस खरेदी करण्याचे नियोजन केले आहे.
यासाठी ‘कोसिस ई-मोबिलिटी सर्व्हिसेस’ या परदेशी कंपनीला बसगाड्या तयार करून पुरविण्याचे काम देण्यात आले आहे. मात्र या बसगाड्यांना बसविण्यात आलेल्या परदेशी बनावटीच्या बॅटरीची तपासणी करून त्याचे प्रमाणपत्र आणि बससाठी होमोलायजेशन प्रमाणपत्र केंद्रीय रस्ते वाहतूक विभागाकडून मिळवावे लागते. या प्रमाणपत्रांसाठी बस रखडल्याचे कारण कंत्राटदारांकडून दिले जात आहे.
कंपनीच्या १६ बसगाड्या रस्त्यावर उतरविण्यासाठी तयार आहेत, मात्र केंद्रीय विभागाचे प्रमाणपत्र मिळाले नसल्याने या बसना विलंब होत आहे. मात्र पुढील १० दिवसांत ही दोन्ही प्रमाणपत्रे मिळण्याची खात्री असल्याने जुलैअखेरीस पहिल्या टप्प्यातील १० बस केडीएमटीला देण्याचे आश्वासन नुकतेच कंपनीच्या वतीने पालिका आयुक्तांना देण्यात आले आहे. या बसगाड्या चार्ज करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून ६७ ठिकाणी चार्ज स्टेशन उभारले जाणार आहेत. सध्या परिवहनच्या डेपोत याची व्यवस्था करण्यात आली आहे.
सध्या भिवंडी, नवी मुंबई, कोकण भवन, वाशी, बदलापूर-अंबरनाथ या मार्गांवरील बसकडून परिवहनला सर्वाधिक उत्पन्न मिळत असून याच मार्गावर नव्या बसही चालवण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. मात्र मागील दीड ते दोन वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या बस लवकर आणल्या जाव्यात, अशी प्रवाशांची मागणी आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात सध्या नवी मुंबई महापालिकेच्या इलेक्ट्रिक बस चालवल्या जात असून प्रवाशांकडून या बसगाड्यांना सर्वाधिक पसंती मिळत आहे. त्यामुळेच कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून या बस चालवल्या गेल्या तर प्रवाशांची त्यांना विशेष पसंती मिळू शकेल.
ई-बसची वैशिष्ट्ये
- कल्याण-डोंबिवलीत युराबसच्या माध्यमातून प्रथमच इलेक्ट्रिक बस रस्त्यावर धावणार
- युरोपमधील आघाडीच्या इलेक्ट्रिक बस कंपनीकडून बसची निर्मिती
- संबंधित कंपनीशी ‘परिवहन’चा १२ वर्षांचा करार
- नऊ मीटर लांबीच्या बसचा देखभाल-दुरुस्तीचा खर्च अत्यल्प
- बसगाडी वजनानेही हलकी
- कमीत कमी कालावधीत म्हणजेच एक तास चार्ज केल्यानंतर ६० किमी अंतर धावण्याची क्षमता
- देखभाल-दुरुस्तीचा आणि इंधनखर्च कमी झाल्याने तिकीटदर कमी