दरवर्षी जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी वाढली की नागरिकांना सूचना देण्यासाठी नगरपरिषदेकडून भोंगा वाजवला जातो. तसा अलर्ट यावर्षी पहिल्यांदाच देण्यात आला आहे. खेड तालुका प्रशासनाकडूनही नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. जगबुडी नदीच्या काठावर असलेल्या झोपडपट्टीतील नागरिकांनाही अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वेळ पडल्यास या नागरिकांना येथून हलवण्याची तयारी खेड नगरपरिषद प्रशासनाने ठेवली आहे.
खेड नगरपरिषदेचे आपत्कालीन पथक आणि प्रशासन सज्ज असून नगर परिषदेकडून वाजवण्यात आलेल्या भोंग्यानंतर व्यापारी आणि नागरिकांनीही आवश्यक ती काळजी घेण्याची सुरुवात केली आहे. रात्रीच्या दरम्यान पाऊस वाढल्यास खेड जगबुडी नदीला पूर येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. खेड तालुक्याच्या वरील बाजूस असलेल्या सह्याद्री खोऱ्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने जगबुडीच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे.
कोकणातील चिपळूण खेड आणि महाड या शहरांना दरवर्षी पावसाळ्यात पुराचा धोका असतो. यामध्ये यंदाच्या पावसाळ्यात खेड जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने पहिलाच अलर्ट नागरिकांना व्यापाऱ्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर खेड शहर परिसरातील नागरिक, व्यापारी सावध झाले आहेत खेड नगर परिषद व तालुका प्रशासन या सगळ्यावर लक्ष देऊन असून सज्ज आहे.