• Mon. Nov 25th, 2024
    हसन मुश्रीफांनी काही दिवसांपूर्वीच दिलेले बंडाचे संकेत, काल थेट शपथविधी झाला!

    कोल्हापूर: राज्यात काल अजित पवार यांनी घडवून आणलेल्या राजकीय महाभूकंपानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा एकदा नवं वळण लागलं आहे. एकेकाळी आमच्या छातीवर फक्त शरद पवार यांचे नाव आहे असे म्हणणारे कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांनी अजितदादांचा हात पकडून आपल्यावर सुरू असलेली ईडीची पीडा दूर केलीये. मात्र या सर्व घडामोडी एका रात्रीतून घडल्या नाहीत. यामागे अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती हे आता स्पष्ट झाले आहे. दरम्यान याची याची चुणूक आमदार हसन मुश्रीफ यांनी गेल्या आठवड्यात गडहिंग्लज येथे पार पडलेल्या ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या प्रसिद्धी पत्रकात दिली होती. आता या फोटोमागची गुपितं कालच्या घटनेने उलगडत आहेत.

    राज्यात अचानक घडलेल्या राजकीय घडामोडीत आमदार हसन मुश्रीफ यांना पुन्हा मंत्रिपदाची संधी मिळाली. गेल्याच आठवड्यात राष्ट्रवादीतर्फे गडहिंग्लजमध्ये राबवलेल्या ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या प्रसिद्धी पत्रकातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो प्रसिद्ध करण्यामागचे गुपित आजच्या घटनेने उलगडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

    आमदार हसन मुश्रीफ यांच्या मागे सध्या ईडीचा ससेमिरा गडहिंग्लज येथील ब्रिक्स कंपनी आणि सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या कारभारात भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. यानंतर त्यांच्यावर दोन वेळा ईडीची धाड पडली. तर ते अध्यक्ष असलेल्या जिल्हा बँकेमध्ये देखील ईडीने धाड टाकली. यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून चिंतेत होते. न्यायालयाने देखील त्यांना काही काळ दिलासा दिला होता. दरम्यान त्यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर देखील भाजपकडून वारंवार देण्यात येत होती. मात्र आम्ही पवार एके पवार म्हणणारे हसन मुश्रीफ यांच्या मागे लागलेली ईडीची पीडा टाळण्यासाठी ते शरद पवार यांचा हात सोडून अजित पवार यांच्यासोबत भाजपमध्ये गेल्याची चर्चा आहे.

    अजित पवार यांचा शपथविधी जरी काल झालेला असला तरी या मागची रणनीती ही गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. याची चुणूक हसन मुश्रीफांनी २५ जून रोजी गडहिंग्लजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि हसन मुश्रीफ फाउंडेशन कडून घेण्यात आलेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या जाहिरातीतून दाखवली होती. कार्यक्रमाच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीतर्फे प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत मुश्रीफ यांनी नेते शरद पवार, अजित पवार यांच्यासमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो वापरले होते.

    अजितदादांचं धक्कातंत्र सुरुच; जयंत पाटील अन् जितेंद्र आव्हाडांना निलंबित करण्यासाठी राहुल नार्वेकरांना पत्र

    मुश्रीफ यांच्या जाहिरातीत शिंदे व फडणवीसांच्या फोटोमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. हा उपक्रम शासनाचा आहे. शासनाचे नेतृत्व शिंदे व फडणवीस करीत आहेत. या कार्यक्रमाचा आणि महाविकास आघाडीचा काहीही संबंध नाही हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम आहे. यामुळे त्यांचे फोटो वापरल्याचे स्पष्टीकरण मुश्रीफ यांनी दिले होते. मात्र त्याचे खरे कारण कोणते होते, याचा उलगडा आता घडत असलेल्या घडामोडीनंतर झाल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात सुरु आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *