मुंबईत आणखी काही दिवस जोरदार पाऊस असेल. तर मुंबईसह परिसरात मुसळधार पावासाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला पाऊस विकेंडलाही कोसळणार आहे. हवामान विभागाने आज, पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे. पुढील २४ तासांत मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मुंबई शहर आणि उपनगरात देखील मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. IMD मुंबईने याबद्दलचा इशारा दिला आहे.
कुठल्या जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट…
IMD मुंबईने दिलेल्या अंदाजानुसार, आज मुंबई, नाशिक, ठाणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर पुणे, रायगड आणि पालघरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर इतर सर्व जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस असेल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज पडल्यासच घराबाहेर पडावं, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
पुढचा आठवडाही पावसाचा…
दरम्यान, जून महिन्यामध्ये कोकण विभागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असला तरी जुलैच्या पहिल्या आठवड्यात कोकण विभागात पावसाची उपस्थिती चांगलीच जाणवेल असा अंदाज आहे. सिंधुदुर्गात रविवारपासून, तर रत्नागिरीमध्ये सोमवारपासून आणि रायगडमध्ये मंगळवारपासून ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. मुंबईमध्येही मंगळवारी आणि बुधवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यांमध्ये येत्या आठवड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शनिवारी मुंबईमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. दिवसभरात मात्र मुंबईत फारसा पाऊस पडला नाही. सकाळी ८.३० ते सायं. ५.३० पर्यंत कुलाबा येथे ६.८, तर सांताक्रूझ येथे ५.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या तुलनेत शुक्रवारी दिवसभर पडलेल्या पावसाने सांताक्रूझ येथे ११०.८ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला, तर कुलाबा येथे ४५.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.