पूनम सतेंद्र रातुरी (वय ४१, रा. यश संकुल सोसायटी, पिंपळे सौदागर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचे पती सतेंद्र शिवानंद रातुरी यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डंपरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोकणे चौकात असलेल्या एसएनबीपी शाळेच्या स्कूल बस काही कारणांनी दोन दिवस बंद राहणार असल्याचे शाळा प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी जाहीर केले होते. त्यामुळे मुलांना आणण्यासाठी आलेल्या पालकांच्या वाहनांमुळे कोकणे चौक ते शाळा परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान, दुपारी दोन वाजता परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यातच पूनम या मुलगी श्रेयाला आणण्यासाठी दुचाकीवरून स्वराज चौकातून कोकणे चौकाच्या दिशेने जात होत्या.
यावेळी कोकणे चौकातून आलेल्या डंपरसमोर त्या अचानक पडल्या आणि डंपरचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेले. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. या अपघाताची माहिती मिळताच माजी नगरसेवक शत्रुघ्न ऊर्फ बाप्पू काटे आणि विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पूनम यांना तत्काळ औंध हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले; परंतु त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
कोकणे चौकात वाहतूक पोलिस का उपस्थित नव्हता, याची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल. यापुढे महत्त्वाच्या चौकांत पोलिस न थांबल्यास त्यांच्यावर आवश्यक ती कठोर कारवाई केली जाणार आहे. प्रत्येक चौकात वाहतूक नियमनासाठी पोलिस नियुक्त केला जाईल.
– विठ्ठल कुबडे, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक विभाग