मुंबई दि. ३० : एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी रासायनिक उद्योगांची भूमिका महत्त्वाची आहे. यापुढील काळात शाश्वत विकासासाठी रासायनिक उद्योजकांनी हरित उद्योग उभारणीसाठी चळवळ उभी करावी. यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
‘शाश्वत भारतासाठी क्रांती’ या विषयावर रासायनिक परिषदेचे आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजन करण्यात आले होते. परिषदेत भविष्यातील उद्योगासाठी ‘नाविण्यपूर्ण हरित उद्योग, शोध आणि विकास’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्योग मंत्री श्री.सामंत बोलत होते. स्पाईस जेटचे चेअरमन आणि ‘असोचेम’ (असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्री ऑफ इंडिया) चे अध्यक्ष अजय सिंग, ‘असोचेम’ चे चेअरमन शंतनू भटकमकर, उद्योजक समीर सोमय्या, उमेश कांबळे यांच्यासह विविध उद्योग संस्था आणि समूहांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मंत्री श्री. सामंत म्हणाले की, राज्यात अधिक रासायनिक उद्योग उभारायचे असल्यास, प्रदूषण विरहित उद्योग उभारण्यासाठी उद्योजकांनी चळवळ उभी करावी. उद्योगामुळे आपल्याला हानी होणार नाही, अशी भावना स्थानिकांच्या मनात निर्माण होणे गरजेचे आहे. जेणेकरून जास्तीत जास्त उद्योग राज्यात उभारता येतील. अर्थव्यवस्था वाढीसाठी रासायनिक उद्योग महत्त्वाचे आहेत. जे उद्योग राज्यात गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत त्यांना शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोरोना काळात बंद पडलेले उद्योग पुन्हा सुरू केल्यास राज्यात क्रांती येईल. उद्योग जगताला पुढे नेणारे महाराष्ट्र राज्य आहे. राज्यात विदेशी गुंतवणूक वाढण्यासाठी राज्य अव्वल ठरले आहे. कोणतेही उद्योग राज्याबाहेर गेले नसून, आयटी पॉलिसी पुन्हा सुरू केल्याने उद्योगांनी नव्याने गुंतवणूक केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या दृष्टीने राज्य शासन कार्य करीत असल्याचे सांगून या परिषदेस मंत्री श्री. सामंत यांनी शुभेच्छा दिल्या.
०००
श्रद्धा मेश्राम/ससं/