• Sat. Sep 21st, 2024

लाच घेण्याची तयारी झाली, पण शंकेची पाल चुकचुकली अन्… निलेश अपार यांची ACB चौकशी

लाच घेण्याची तयारी झाली, पण शंकेची पाल चुकचुकली अन्… निलेश अपार यांची ACB चौकशी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविणारे दिंडोरीचे उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांची गुरुवारी दिवसभर लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात चौकशी करण्यात आली. अपार यांच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याच्या मनात कारवाईबाबत शंकेची पाल चुकचुकल्याने हा सापळा फसल्याची माहिती पुढे आली आहे.

मुंबई येथील एका उद्योजकाची दिंडोरीत कंपनी आहे. जमीन अकृषक न करताच तेथे उद्योग उभा केल्याबाबत डॉ. अपार यांनी आक्षेप घेतला होता. तोंडी आदेशानेच काही दिवसांपूर्वी हा कारखाना बंद करण्यात आला होता. या प्रकरणात कारवाई न करण्यासाठी डॉ. अपार यांनी २२ मे रोजी संबंधित उद्योजकाकडे ५० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ४० लाख रुपये स्वीकारण्यास डॉ. अपार तयार झाल्याचे पुरावे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागले. ८ जून रोजीदेखील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सापळ्याचा प्रयत्न झाल्याची माहिती पुढे आली आहे. २८ जून रोजी पैसे स्वीकारण्याची तयारी डॉ. अपार यांनी दर्शविली होती. दुपारपर्यंत त्यांच्या कार्यालयातील कामकाज सुरळीत सुरू होते. डॉ. अपार हे लाच स्वीकारण्याच्या तयारीत असले, तरी सावध होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाची वाहने परिसरात थांबून होती. परंतु, झेरॉक्स काढण्याच्या निमित्ताने कार्यालयातून बाहेर पडलेल्या एका कर्मचाऱ्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्याने अपार यांना सावध केल्याने त्यांनी पैसे न स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

…तर निलंबनही शक्य

दरम्यान, अपार याच्या कार्यालयासह ते राहत असलेल्या दिंडोरीतील सरकारी व नाशिक शहरातील खासगी निवासस्थानाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून झडती घेण्यात आली. दिवसभर अपार यांना शरणपूररोडवरील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात बसवून ठेवण्यात आले होते. अपार यांच्याकडील प्रकरणांची माहितीदेखील घेण्यात आली. लाचेची मागणी करणे हाच गुन्हा असून, अपार यांना अटक करण्यात आली नसली, तरी महसूल विभाग त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करू शकतो, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
नाशिकला लाचखोरीचं ग्रहण कायम; ४० लाखांच्या लाचेची मागणी उपविभागीय अधिकाऱ्याला भोवली, जिल्ह्यात खळबळ
लाचेसाठी रक्कम होती तयार

अपार याने लाच स्वीकारावी याकरिता काही रक्कम तयार ठेवण्यात आली होती, अशी माहिती गुरुवारी पुढे आली. अपार यांनी या प्रकरणात एकाही कर्मचाऱ्याला किंवा हस्तकाला मध्यस्थी ठेवले नव्हते. परंतु, लाच स्वीकारण्यापूर्वीच कारवाईच्या शक्यतेने ते सावध झाले. त्यामुळे हा सापळा यशस्वी होऊ शकला नाही. अपार हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील आहेत. चांदवड येथे त्यांनी ‘बीएचएमएस’चे वैद्यकीय शिक्षण घेतले असून, उपविभागीय अधिकारी म्हणून त्यांनी यापूर्वी मेहकर आणि अकोला येथे काम केलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed