जालना रेल्वे मार्गावरून दिल्ली आणि उत्तर भारताकडे जाणाऱ्या रेल्वेंना मनमाडहून जावे लागत आहे. या रेल्वे मनमाडहून चाळीसगाव आणि जळगाव मार्गे उत्तर भारताकडे जात असतात. सोलापूर ते धुळे या राष्ट्रीय महामार्गाचे कामाची घोषणा झाल्यानंतर गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी सर्वात प्रथम दौलताबाद ते चाळीसगाव असा ९४ किलोमिटरचा रेल्वे मार्ग तयार केल्यास, मनमाड न जाता थेट रेल्वे गाड्या चाळीसगावला पोहोचतील. प्रवाशांचा वेळ आणि पैशांचा अपव्यय टळेल असा प्रस्ताव दिला होता. यासाठी त्यांनी तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांचीही भेट घेतली होती.
याशिवाय तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरे यांनीही दौलताबाद चाळीसगाव रेल्वे मार्गासाठी प्रयत्न केले होते. यानंतर राज्यसभेचे खासदार व सध्या केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी कन्नड भागातील नागरिकांची बैठक घेतली होती. शिवाय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते रेल्वेमंत्री यांच्यापर्यंत अनेक जणांनी या प्रस्तावाचा पाठपुरावा केला होता. दरम्यान रेल्वे विभागाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात हा रेल्वे मार्ग तोट्यात दाखवून हा मार्ग रद्द केला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर हा प्रस्ताव ‘महारेल’कडे देण्यात आला होता. महारेलने या मार्गाचा अभ्यास करून डिपीआर तयार केला. हा प्रस्ताव तत्कालीन परिवहन विभागाकडे सादर करण्यात आला होता. या डीपीआरवर तत्कालीन महाआघाडी सरकारच्या काळात निर्णय घेण्यात आला नव्हता. यामुळे ‘महारेल’कडून काम थांबविण्यात आलेले होते.
जालना-जळगाव हा १७४ किलोमीटरच्या रेल्वे मार्गाचे रेल्वे विभागाचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणानंतर आता जालना-जळगाव प्रस्तावित रेल्वे मार्गाला राज्य सरकारने तीन हजार कोटी रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळात मंजूर केला आहे. जालना-जळगाव या जलद गतीने मंजूर झालेल्या रेल्वे प्रस्तावामुळे दौलताबाद ते चाळीसगाव हा रेल्वे मार्ग कायमचा रद्द करण्यात येईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
चाळीसगावसाठी दोन मार्गांचे प्रस्ताव
दौलताबाद ते चाळीसगाव हा रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी ‘महारेल’ने तयार केलेल्या डीपीआर मध्ये दोन मार्गांचा विचार करण्यात आला होता.यात गवताळा अभयरण्यातून जाण्यासाठी मार्ग न मिळाल्यास दुसऱ्या बाजूने रेल्वे मार्ग तयार करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता.
बोगद्यामुळे खर्च वाढला
दौलताबाद चाळीसगाव रेल्वेमार्गासाठी गवताळा अभयारण्य; तसेच अन्य काही ठिकाणी बोगदे तयार करण्याचे नियोजन करण्यात आले होते. हे बोगद्यांवरच कोट्यावधी रुपये खर्च होणार असल्याची ओरड तत्कालीन रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली होती.
कन्नडवासीयांनी केले प्रयत्न
दौलताबाद चाळीसगाव या प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी कन्नड भागातील व्यापारी, नागरीकांनी प्रयत्न केले. अनेक जणांनी केंद्रीय मंत्र्यांना भेटून दौलताबाद चाळीसगाव रेल्वे प्रकल्प मंजूर करून निधी देण्याची मागणीही केली होती.