• Mon. Nov 25th, 2024

    मी गुगली टाकली अन् देवेंद्र फडणवीसांची विकेट गेली, पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांचं भाष्य

    मी गुगली टाकली अन् देवेंद्र फडणवीसांची विकेट गेली, पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांचं भाष्य

    मुंबई: २०१९ साली सत्तासंघर्षाच्या घडामोडी सुरु असताना मी टाकलेल्या गुगलीवर देवेंद्र फडणवीस यांची विकेट गेली, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शरद पवार यांनी पहाटेच्या शपथविधीच्या तीन-चार दिवस आधी माघार घेतली आणि डबल गेम केला, असे वक्तव्य केले होते. याविषयी शरद पवार यांनी गुरुवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत भाष्य केले. त्यांनी म्हटले की, माझे सासरे होते, सदू शिंदे. ते देशातील उत्कृष्ट गुगली बॉलर होते. त्यांनी देशातील मोठमोठ्या खेळाडूंच्या विकेट घेतल्या होत्या. मी देखील जगाच्या क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष होतो. त्यामुळे मी क्रिकेट खेळलो नसलो तरी मला गुगली कसा आणि कुठे टाकायचा, हे चांगलं माहिती आहे. समोरचा विकेट देत असेल तर ती घेतलीच पाहिजे. देवेंद्र फडणवीस हे त्यांची विकेट गेली, हे सांगतच नाहीत. पण पहाटेच्या शपथविधीच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस हे सत्तेसाठी काय करु शकतात, कोणत्या थराला जाऊ शकतात, हे दिसून आल्याचे शरद पवार यांनी म्हटले.

    देवेंद्र फडणवीस म्हणतात की, शपथविधीच्या आधी आमची बैठक झाली होती, पण दोन दिवसांनी शरद पवार यांनी भूमिका बदलली. देवेंद्र फडणवीस हे मला भेटले होते आणि आमच्यात सत्तास्थापनेबाबत चर्चाही झाली होती, ही बाब मी मान्य करतो. पण मी तो प्रस्ताव मान्य केला असता तर मी जाहीरपणे तसे सांगितले असते. २०१४ साली आम्ही उघडपणे भाजपला बाहेरून पाठिंबा दिला होता. त्यामुळे २०१९ मध्येही आमच्यात तसं काही ठरलं असतं तर मी जाहीरपणे सांगितले असते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस मला भेटले होते, ही गोष्ट खरी आहे. त्यावेळी अनेक गोष्टींवर चर्चा झाली. पण फडणवीस स्वत: म्हणतात त्याप्रमाणे मी यासंबंधी धोरण बदलले. मग मी धोरण बदलले असताना देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घ्यायचं काय कारण होतं? मी नकार दिल्यावरही देवेंद्र फडणवीस यांनी चोरून शपथ का घेतली? देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याची खात्री होती तर मग त्यांनी चोरून शपथ का घेतली? फडणवीस यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा असता तर सरकार दोन दिवसांत कोसळले असते का? राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नसल्यानेच देवेंद्र फडणवीस यांना राजीनामा द्यावा लागला. पण फडणवीस यांच्या या कृतीचा स्वच्छ अर्थ होता की, सत्तेसाठी आम्ही कुठे जाऊ शकतो. त्यांची ही पावलं समाजासमोर यावीत, यादृष्टीने काही गोष्टी करण्यात आल्या होत्या, असे शरद पवार यांनी सांगितले. मी फसवलं असे फडणवीस म्हणतात, पण ते स्वत: का फसले? या सगळ्यात मोदींचा काहीही संबंध नव्हता. देवेंद्र फडणवीस यांना सत्तेशिवाय करमत नव्हते, ते सत्तेशिवाय जगू शकत नव्हते. त्यांची ही अस्वस्थता महाराष्ट्रासमोर येणे गरजेचे होते, असे शरद पवार यांनी सांगितले.

    Devendra Fadnavis: कल्याण-डोंबिवलीची जागा कोण लढवणार, देवेंद्र फडणवीसांनी सस्पेन्स संपवला, स्पष्टच म्हणाले…

    देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले होते?

    पहाटेचा शपथविधी हा शरद पवारांचा डाव होता.एवढंच नव्हे तर ‘भाजप आणि राष्ट्रवादीचं सरकार स्थापन करण्यासाठी शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली होती. पण ‘शपथविधीच्या तीन-चार दिवस आधी ऐनवेळी पवारांनी माघार घेतली. नी पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केले. शरद पवार आमच्यासोबत निवडून आलेले नव्हते. त्यांनी आमचा वापर करून घेतला. शरद पवारांनी रणनीती आखली आणि आमची दिशाभूल केली एकप्रकारे आमचा डबलगेम केला, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

    फडणवीस २०१९ च्या शपथविधीसह सेनेच्या त्या जाहिरातीवर स्पष्टपणे बोलले, मुख्यमंत्र्यांनी ती चूक होती हे मान्य…

    शपथविधीची तयारी झाल्यामुळे अजित पवारांना आमच्यासोबत येण्याशिवाय पर्याय नव्हता.शरद पवार यांच्यासोबत बैठकीत ठरल्याप्रमाणे आम्ही दोघांनी सर्व गोष्टी केल्या. शपथविधीसाठी शरद पवार येतील असे अजित पवारांना वाटले होते. सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांना विश्वासात घेऊनच केला होता, असा दावा देवेंद्र फडणवीसांनी एका मुलाखतीत केला होता.

    फडणवीसांना इतिहास माहित नसेल, १९७७ साली मी सरकार बनवलं तेव्हा भाजप माझ्यासोबतच; शरद पवारांनी सुनावलं

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *