या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी राज्यातून बेपत्ता असलेल्या महिलांच्या आकडेवारीचा तपशीलही सादर केला. ते म्हणाले की, मुली व महिला बेपत्ता होण्याचे राज्यातील प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मी पुणे, ठाणे, मुंबई, सोलापूर या महापालिकांच्या कार्यक्षेत्रातील माहिती घेतली. त्यामध्ये जानेवारी २०२३ ते २३ मे या सहा महिन्यांच्या काळात ठाण्यातून ७२१ महिला बेपत्ता झाल्या आहेत. तर मुंबईतून ७३८, सोलापूर ६२, पुण्यातून ९३७ मुली बेपत्ता झाल्या आहेत. हा सगळा आकडा मिळून २४५८ इतका आहे. या बेपत्ता महिलांचा शोध घेऊन कुटुंबीयांच्या ताब्यात दिलं पाहिजे. गृहमंत्र्यांनी बाकीची वक्तव्य करण्याऐवजी मुली आणि महिलांच्या संरक्षणासाठी उपाय केले पाहिजेत, असे शरद पवार यांनी म्हटले.
शीख आणि जैन समाजाला समान नागरी कायदा मान्य आहे का; शरद पवारांचा सवाल
काल पंतप्रधान नरेंद्र मोदी समान नागरी कायद्यावर बोलले. यात माझी आणि माझ्या पक्षाची भुमिका मी सांगत आहे. समान नागरी कायद्याबाबत शीख, ख्रिश्चन आणि जैन समाजाची भूमिका काय स्पष्ट झालं पाहिजे. शीख समाजात वेगळं मत आहे, समान नागरी कायद्याला समर्थन करायची त्यांची मनस्थिती नाही, असं माझ्या ऐकण्यात आलं. या वर्गाला आणि मताला दुर्लक्षित करुन समान नागरी कायद्याचा निर्णय घेणं योग्य होणार नाही. शीख आणि जैन समाजाच्या भूमिकेबाबत स्पष्टता यायला हवी. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा सरकारमधील अन्य कोणत्याही व्यक्तीने याबाबतची परिस्थिती मांडावी. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समान नागरी कायद्याला पाठिंबा द्यायचा की नाही, याबाबत भूमिका घेईल. देशातील चित्र पाहता लोकांच्या मनात सध्याच्या राज्यकर्त्यांबद्दलची नाराजी, अस्वस्थता आहे. यापासून लक्ष विचलित करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे का ही शंका घ्यायला जागा आहे, असेही शरद पवार यांनी म्हटले.
पंतप्रधान मोदी अस्वस्थ झालेत- शरद पवार
विरोधक एकत्र आल्यामुळे मोदींकडून वैयक्तिक टीका करणे सुरु आहे. विरोधकांच्या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अस्वस्थता वाढली आहे. 13 आणि 14 जुलै रोजी विरोधकांची पुढील बैठक बंगलोरला होणार आहे, असे शरद पवार म्हणाले. येत्या वर्षभरात लोकसभा निवडणुका येतील. मध्यंतरीच्या काळात काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका होतील. त्यामुळे पंतप्रधान मोदी अस्वस्थ असल्याचे वाटत आहे. विरोधक एकत्र आल्यामुळे मोदींकडून वैयक्तिक टीका करणे सुरु आहे. विरोधकांच्या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अस्वस्थता वाढल्याचा दावा शरद पवार यांनी केला.