महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परिक्षेचा निकाल जाहीर केला आहे. त्यात जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता या पदासाठी झालेल्या परिक्षेत शहरातील प्रथमेश कोतकर यांनी यश मिळविले आहे. प्रथमेशचे वडील राजेंद्र कोतकर हे धुळे शहरातील मुख्य बाजारपेठेत किरकोळ स्वरूपात भाजी विक्री करतात. त्यांची आई छाया कोतकर या पती राजेंद्र यांना त्यांच्या परीने मदत करीत असतात. प्रतिकूल परिस्थितीत राजेंद्र आणि छाया कोतकर यांनी प्रथमेशला शिकविले.
प्रथमेश याचे दहावी पर्यंतचे शिक्षण येथील न्यू सिटी हायस्कूलमध्ये झाले आहे. बारावीचे शिक्षण जयहिंद सीनिअर कॉलेज, तर छत्रपती संभाजी नगरमधील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून बीई सिव्हिलची पदवी घेतली आहे. त्यांनी एमपीएससी अभियांत्रिकी सेवा परीक्षेत ८७ वा रँक मिळविला ते जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता (श्रेणी- २, राजपत्रित) पदी रुजू होतील.
तत्पूर्वी, अभियांत्रिकी शाखेची पदवी मिळविल्यानंतर प्रथमेश यांनी मुंबईत लोढा ग्रुपमध्ये दोन वर्षे काम केले. ॲमेझॉनमध्ये दीड वर्षे काम करून त्यांनी हे यश संपादन केले आहे. या यशाबद्दल त्यांचा लाडशाखीय वाणी समाजात आज सत्कार करण्यात आला. वाणी समाजाचे नेते सुनील नेरकर, राजेंद्र चितोडकर, दिलीप पाखले, अजय कासोदेकर, शिक्षिका रोहिणी कुलकर्णी, वडील राजेंद्र कोतकर, आई छाया कोतकर व समाजबांधव आदी उपस्थित होते. नेरकर म्हणाले, की प्रथमेश यांच्या यशामुळे लाडशाखीय वाणी समाजाचे नाव उंचावले असून पुढेही अभ्यास सुरू ठेवत त्यांनी जिल्हाधिकारी संवर्गातील उच्चपदासाठी परीक्षा द्यावी व यश मिळवावे.