• Tue. Nov 26th, 2024

    महारोजगार मेळाव्यात मोठ्या प्रमाणात नोकरीची संधी उपलब्ध; रोजगार मेळाव्याचा युवकांनी लाभ घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

    ByMH LIVE NEWS

    Jun 27, 2023
    महारोजगार मेळाव्यात मोठ्या प्रमाणात नोकरीची संधी उपलब्ध; रोजगार मेळाव्याचा युवकांनी लाभ घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

    जळगाव (जिमाका वृत्तसेवा), दि.27 – जिल्हास्तरीय महारोजगार मेळाव्यात युवकांना मोठ‌्या प्रमाणात नोकरीची संधी उपलब्ध होत असून अशा रोजगार मेळाव्यांचा युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

    ‘शासन आपल्या दारी’ अभियांनातर्गत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव येथे आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय जिल्हास्तरीय रोजगार मेळावा संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. या मेळाव्यास जिल्हाधिकारी अमन मित्तल, मुख्यमंत्री जन कल्याण कक्षाचे राज्य मुख्य समन्वयक डॉ. अमोल शिंदे, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त वि. जा. मुकणे, नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य एल. पी. देशमुख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच मोठया संख्येने विद्यार्थी मेळाव्यास उपस्थित होते.

    यावेळी बोलतांना पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, शासन आपल्या दारी अभियांनातंर्गत राज्यात जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केन्द्रामार्फत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिराच्या माध्यमातून रोजगारास इच्छुक नवयुवकांना नव कौशल्य, प्रशिक्षण व रोजगारांची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या देशामध्ये तरुणांना सर्वांत मोठा भेडसावणार प्रश्न म्हणजे नोकरी.  आज येथे शिबिरात ज्या ज्या कंपन्यानी युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करुन दिली आहे. या मेळाव्यात उमेदवारांना आपल्या पसंतीच्या क्षेत्रात नोकरीची संधी आहे. युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा.

    पालकमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले की, कोणतीही नोकरी व्यवसाय हा लहान नसून मी सुद्धा सुरवातीला कंपनीत नोकरीत केली असल्याचे त्यांनी सांगितले. तरुण मित्रांनी मिळालेल्या संधीचे सोने करावे आणि कंपनीच्या प्रतिनिधींनी सुद्धा मुलाखतील पात्र उमेदवारांना लवकरच नियुक्ती पत्रे द्यावी. याठिकाणी विविध कंपन्याचे स्टॉल लावले असून या ठिकाणी आपण आपले कागदपत्रे देवून आपल्या निवडीनुसार रोजगार प्राप्त करुन घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या रोजगार मेळाव्यास कंपनीच्या प्रतिनिधीनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिल्यामुळे पालकमंत्र्यांनी सर्वाचे आभार मानले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध मंडळामार्फत मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना कर्ज मंजूरीच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.

    जिल्हाधिकारी श्री. मित्तल म्हणाले की, जिल्ह्यात रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहे. कौशल्य विकास विभागामार्फत दर दोन तीन महिन्यांनी असे रोजगार मेळावे घेतले जातात. त्यातून अनेकांना नोकरीची संधी उपलब्ध होत आहे. आजच्या शिबिराच्या माध्यमातून मिळणारी माहिती व मार्गदर्शन उपयुक्त आहे. युवकांनी नोकरीच्या मागे न लागता शासनाच्या विविध विभागामार्फत देण्यात येणाऱ्या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले. यावेळी मुख्यमंत्री जन कल्याण कक्षाचे राज्य मुख्य समन्वयक डॉ. अमोल शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

    या मेळाव्याला युवक-युवतींचा उत्स्फुर्त प्रतिसाद दिसून आला. या मेळाव्यात शासनाच्या कौशल्य विभागाच्या माध्यमातून शासनाच्या स्टार्टअप व स्वयंरोजगार योजनांचे स्टॉल देखील याठिकाणी लावण्यात आले आहेत. तसेच 12 नामांकित कंपन्या या ठिकाणी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी या रोजगार मेळाव्यात सहभागी झाल्या होत्या.

    000000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed