अशा सगळ्या वातावरणात एकाग्रतेने अभ्यास करणे खचितच अशक्य… अभ्यासाला अनुकूल वातावरण नसल्याची कल्पना असल्याने तिने चक्क मागील वर्षीच्या मेपासूनच रात्रीच्या अध्ययनाची पद्धत अंगीकारून अभ्यास सुरू केला होता. त्यासाठी तिने एक वेळापत्रक सुरुवातीलाच बनवले होते. कधीही खासगी शिकवणी न लावलेल्या दुर्वाला नववी-दहावीसाठी आवर्जून कनेकर क्लासेसची शिकवणी लावण्यात आली. करोनाकाळात अभ्यासावर झालेला परिणाम लक्षात घेऊन ती कुठे कमी पडू नये म्हणून हा निर्णय घेतल्याचे तिचे वडील प्रसाद भोसले यांनी सांगितले, तर क्लासमधील विष्णूसरांनी अभ्यासात खूपच दक्षतेने मदत केल्याचे दुर्वा आवर्जून नमूद करते.
धोबीघाट परिसरातील चाळीत दुर्वाच्या वडिलांचे घर होते. या चाळी तुटून जवळपास १५ वर्षे झाली. तिथे इमारती उभ्याही राहिल्या आहेत. पण, अंतर्गत वाद आणि प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यांना अद्याप घराचा ताबा मिळालेला नाही. बिल्डरने पहिली पाच-सहा वर्षे भाडे दिले. नंतर तेसुद्धा बंद झाले. अशा स्थितीत प्रसाद यांचे बंधू जीवन भोसले यांनी आधार दिला. मागील अनेक वर्षांपासून ते भावाच्या जोडीने वृत्तपत्रविक्रीचा व्यवसाय करतात. घरातील १० माणसांचा उदरनिर्वाह होईल, मुलांच्या शिक्षणाचा खर्च जेमतेम भागेल एवढे उत्पन्न यातून प्राप्त होते. घरातील कामातून वेळ मिळेल तसे शिलाईकाम करून दुर्वाची आई जमेल तितकी आर्थिक साथ देते. करोनाकाळात वृत्तपत्रविक्रीवर परिणाम झाल्याने हे कुटुंब आर्थिक विवंचनेत सापडले होते. परंतु यावेळी प्रसाद यांच्या मिल कामगार असलेल्या वडिलांच्या गाठीस असलेली पुंजी त्यांचा आधार ठरली.
अशा सगळ्या परिस्थितीतून जिद्दीने मार्गाक्रमण करत दहावीत चमकदार यश मिळवलेल्या दुर्वाला आयटी किंवा कम्प्युटर इंजिनीअर व्हायचे आहे. अर्थात, तिची या ध्येयाकडील वाटचाल ‘मटा’च्या मायबाप वाचकांच्या सढळ हस्ते मदतीतून अधिक सहज-सुकर होईल!
