मुंबईत ६० ठिकाणी स्वयंचलित पर्जन्यमापन केंद्रे
स्वयंचलित पर्जन्यमापन केंद्रांद्वारे दर १५ मिनिटांचा अहवाल मुंबईकरांच्या माहितीकरिता आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या dm.mcgm.gov.in या संकेतस्थळावर नियमितपणे अद्ययावत केला जातो. मान्सून कालावधीत समुद्रास येणाऱ्या भरती-ओहोटीच्या वेळा, लाटांची उंची, •कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त हवामान अंदाज, पाणी तुंबल्यामुळे वळविण्यात आलेल्या वाहतुकीची माहिती, लोकलची वाहतूक विलंबाने होत असल्यास त्याबाबतची रेल्वे नियंत्रण कक्षाकडून प्राप्त अद्ययावत माहिती, विमानतळावरील विमानांच्या आवागमनावर काही परिणाम झाला असल्यास त्याची माहितीही या संकेतस्थळावर उपलब्ध होण्यास मदत होते. जास्तीत जास्त व अचूक माहिती मिळावी यासाठी दुसऱ्या टप्प्यात मुंबईत ६० ठिकाणी स्वयंचलित पर्जन्यमापन केंद्रे उभारण्यात येणार आहेत.
शाळा परिसर, रहिवासी इमारती, खासगी तसेच सरकारी कार्यालये, रुग्णालये इत्यादी ठिकाणी ही केंद्रे उभारण्यात येणार असल्याची माहिती पालिकेने दिली. यासाठी ४५ ठिकाणी सर्वेक्षण पूर्ण झाले आहे, तर १५ ठिकाणी केंद्रे बसवण्यासाठी व्यवहार्यता तपासली जात आहे. चार महिन्यांत ही यंत्रणा बसवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, ४५ केंद्रांच्या उभारणीला सुरुवात झाली असून, यातील काही यंदाच्या पावसाळ्यात उपलब्ध होण्याची शक्यता असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
अडीच कोटींचा खर्च
केंद्र उभारणीसाठी अडीच कोटी रुपये खर्च येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात १००हून अधिक केंद्र बसवण्याचा पालिकेचा विचार होता. मात्र, यासाठी लागणारी मोठी जागा पाहता, तो रद्द करून ६० केंद्रेच बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. यातील प्रत्येक केंद्राचा खर्च हा साधारण पाच लाखांपर्यंत आहे.