मुंबई ठाण्यात पावसाची हजेरी
मुंबईत आज सकाळी वांद्रे परिसरात पावसानं हजेरी लावली. ठाणे जिल्ह्यात देखील पावसानं हजेरी लावली. ठाणे, कल्याण डोंबिवली, अंबरनाथ मध्ये पावसानं हजेरी लावली आहे. ठाण्यात आज सकाळपासून पावसानं हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने हजेरी लावल्यानं दिलासा मिळाला. कल्याण – डोंबिवली जवळील ग्रामीण भागात पावसाला सुरवात झाली आहे. वातावरणात बदल झाल्याने कल्याण-डोंबिवलीकर सुखावले.
अंबरनाथमध्ये देखील आज सकाळी पावसाला सुरुवात झाली.सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याचं दिसून आलं. पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाल्याचं दिसून आलं. उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि ग्रामीण भागात पावसाचं आगमन झालं.
चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी
चंद्रपूरमध्ये अखेर दीर्घ प्रतीक्षेनंतर काल पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला होता. त्या अंदाजानुसार जिल्हयात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. एकंदरीतच चंद्रपूर जिल्ह्याचा पारा ४२ अंश सेल्सिअस वर गेला असताना नागरिकांना उकाडा जाणवत होता. मात्र, पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. भारतीय हवामान विभागानं देखील चंद्रपूरमध्ये मान्सून सक्रीय होईल आणि तिथून तो विदर्भात सक्रीय होईल, असं सांगितलं होतं.
रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यात काल पावसानं हजेरी लावली होती. कोल्हापूरमध्ये राधानगरी तालुक्यात पाऊस बरसला. तर, रत्नागिरी जिल्ह्यात काल रात्री काही ठिकाणी पाऊस पडला होता. साताऱ्यात आज ढगाळ वातावरण दिसून आलं. भारतीय हवामान विभागानं नाशिकमध्ये सोमवारपासून पाऊस सुरु होईल, असा अंदाज वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागानं मान्सूनसाठी अनुकूल बदल वातावरणात झाल्याचं म्हटलं आहे.