वयोवृद्ध आई पुनर्विवाह करणार असल्यामुळे प्रॉपर्टी आपल्या नावावर होणार नाही, म्हणून आईस मारहाण करीत तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मुलाविरुद्ध आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यासंदर्भात शहरातील नटराज चित्रमंदिरासमोर काझी प्लॉट भागातील सरोजनी ऊर्फ सरोज रणजित परदेशी- कांबळे (वय ६६) यांचा ५ जूनला सायंकाळी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात आला.
यासंदर्भात सरोजनी कांबळे यांची बहीण निवृत्त शिक्षिका सुधा सुकदेव काटकर (वय ८१ रा. कल्याण) यांनी आझादनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बहीण सरोजनी परदेशी या पती रणजित परदेशी व मुलगा इनायत रणजित परदेशी (वय ३६) सोबत राहत होत्या. सरोजनी या पंजाब नॅशनल बँकेत तर रणजित परदेशी हे येवला येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. दोघेही पाच वर्षांपासून निवृत्त झाले होते. नंतर ते सत्यशोधक मार्क्सवादी संघटनेचे काम करीत होते.
रणजित परदेशी यांना आजार असल्याने ते बिछान्यावर पडून आहेत. इनायत हा घरीच आई- वडिलांची देखरेख करीत होता. सरोजनी परदेशी या पुनर्विवाह करणार म्हणून इनायत हा त्यांच्या चारित्र्यावर संशय घेत असे. आईने दुसरा विवाह केल्यास सर्व प्रॉपर्टी आपल्या नावावर होणार नाही. या कारणावरून सरोजनी या वयोवृद्ध असून त्यांना मारहाण केल्यास त्यांना मृत्यू येऊ शकतो, असे माहीत असताना इनायतने वेळोवेळी आई सरोजनी यांना हाताबुक्क्यांनी मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या मृत्यूस मुलगा इनायत कारणीभूत आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे आता या प्रकरणी इनायत परदेशी याच्यावर काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.