याबाबत अधिक माहिती अशी की, आकाश पांडुरंग दळवी हे खांडवीचे ग्रामपंचायत सदस्य असून माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते आहेत. दळवी दि.१९ जून रोजी मध्यरात्री एक वाजता गावाशेजारील ओढ्याजवळून जात होते.त्यावेळी ओढ्यात अवैध वाळू उत्खनन होत असल्याचे पाहून आकाश दळवी यांनी ताबडतोब या चोरीचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले आणि याचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित केले.यानंतर दळवी यांनी अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या वाळू माफियांना अडविण्याचा प्रयत्न केला.
दळवींना पाहून वाळू उपसा करणारे ट्रॅक्टरचालक आणि जेसीबीचालक आपली वाहने घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला असता आकाश दळवी यांनी वाळू माफियांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी वाळू माफियांनी आकाश दळवी यांना रस्त्यावर जबर मारहाण केली. या मारहाणीत दळवींच्या डोक्याला व हातापायांना जबर मार लागला असून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
ग्रामपंचायत सदस्य बेशुद्ध असल्याने फिर्याद नोंद नाही:
आकाश दळवी हे जखमी झाल्यापासून अजूनही बेशुद्ध आहेत.दळवींवर सध्या जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. बार्शी तालुका पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी फिर्याद नोंदविण्याचा प्रयत्न केला. पण, दळवी बेशुद्ध असल्याने काहीही नोंद झाली नाही.ग्रामपंचायत सदस्यांच्या नातेवाईकांना संशयित आरोपींबाबत काहीही माहिती नाही. मंगळवारी आकाश दळवीच्या डोक्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
खांडवी गावचे ग्रामपंचायत सदस्य आकाश दळवी हे माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत.त्यांनी चार दिवसांपूर्वी बार्शीचे तहसीलदार व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना तालुक्यात पोलिसांकडून खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढल्याचे निवेदन दिले होते. या निवेदनामध्ये तालुक्यातील मटका, जुगाराचे अड्डे, अवैध गौण खनिज उत्खनन, गांजा व तत्सम अमली पदार्थांची वाहतूक, रेशनिंग धान्याचा काळा बाजार आदी अवैध व्यवसाय यावर कारवाई करावी असे म्हटले होते. निवेदन देऊन चार दिवस उलटल्यानंतर हा हल्ला झाला आहे.