नितीन देशमुख यांनी ठाकरे गटाच्या यूट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये बंडाच्या दिवशी नेमकं काय घडलं, याची रंजक माहिती सांगितली आहे. त्यांनी म्हटले की, विधानपरिषदेची निवडणूक झाल्यावर शिंदे साहेब मला म्हणाले, ‘चल नितीन आपण बंगल्यावर जाऊ’.त्यावेळेस ते शिवसेनेचे नेते होते. मी शिंदे साहेबांच्या गाडीत बसलो. त्या गाडीत कोल्हापूरचे आमदार प्रकाश आबिटकर हेदेखील होते. आम्ही दोघे गाडीने शिंदे साहेबांच्या बंगल्यावर गेलो. त्याठिकाणी संजय राठोड आणि संतोष बांगरही होते. मी संतोष बांगर यांना काही गडबड आहे का, असे विचारले. त्यावर संतोष बांगर यांनी, ‘नाही’ असे उत्तर दिले. कारण त्यांनाही काहीच माहिती नव्हते. मग शिंदे साहेबांनी प्रकाश आबिटकर आणि मला पुन्हा गाडीत बसवले आणि चला म्हणाले. मी त्यादिवशी घरी परत जाण्यासाठी ट्रेनचं तिकीट काढलं होतं. शिंदे साहेब म्हणाले, आपण ठाण्याला जाऊन येऊ. मग मी माझ्या पीएला फोन करुन सांगितलं की, मी ठाण्याला गाडी पकडतो, तुम्ही माझी बॅग घेऊन तिकडे या. मात्र, आमची गाडी ठाण्याला गेलीच नाही, आम्ही ठाण्याच्या पुढे पालघरला गेलो. पालघरला गेल्यावर एका हॉटेलवर आम्ही उतरलो. आम्ही तिकडे चहा घ्यायला थांबलो होतो. त्यावेळी तिथे एकदम अब्दुल सत्तार, संदिपान भुमरे, शंभुराज देसाई या मंत्र्यांच्या गाड्या आल्या. या तिघांना बघून मला कुणकुण लागली की, काहीतरी गडबड आहे.
यानंतर मी हॉटेलशेजारी असलेल्या पान टपरीवाल्याशी बोलायला लागलो. त्याला विचारलं हा रस्ता कुठे जातो? त्यावर पान टपरीवाला म्हणाला की, हा महामार्ग थेट सुरतला जातो, गुजरात बॉर्डर इथून १०० किलोमीटर अंतरावर आहे. त्याचं उत्तर ऐकून मी ओळखलं की, नक्की काहीतरी गडबड आहे. पण मी हिंमत सोडली नाही, आपण कुठेही गेलो तरी पक्षाशी प्रामाणिक राहायचे, हे मनोमन ठरवले. तिथून निघताना प्रकाश आबिटकर दुसऱ्या गाडीत बसले. मी पुन्हा एकनाथ शिंदे साहेबांच्या गाडीत बसलो. गाडीच्या मागच्या सीटवर शिंदे साहेबांचा पीए प्रभाकर, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार असे चौघेजण बसलो होतो. तर शिंदे साहेब पुढच्या सीटवर बसले होते. पालघरमधून निघाल्यावर शिंदे साहेबांनी एकेकाला फोन लावायला सुरुवात केली. हा निघाला का, तो निघाला का? गाड्या कुठपर्यंत पोहोचल्या?, असे ते फोनवर विचारत होते. मग मला पूर्णपणे विश्वास बसला की, आता आपण बाहेर चाललो आहोत आणि काहीतरी गडबड आहे, असे नितीन देशमुख यांनी सांगितले.