डोंबिवली पूर्वेकडील गडकरी पथावर असलेल्या लक्ष्मी निवासमध्ये राहणारे शंतनू रवींद्रनाथ मित्रा (वय ३९) यांना रस्त्यात भेटलेल्या दोघा बदमाशांनी देवाच्या नावाखाली चूना लावल्याचे पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून उघडकीस आले आहे. १०१ पावले चालून बाप्पाचा मंत्रजप करा तरच बरकत येईल, असा सल्ला देणाऱ्या भामट्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवणे या गृहस्थाला चांगलेच महागात पडले. या भामट्यांनी या गृहस्थाकडील ९० हजारांचा ऐवज लुटून पळ काढला असून पोलिस त्यांचा कसोशीने शोध घेत आहेत.
या बाबत अधिक माहिती अशी की, शंतनू मित्रा यांनी शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील फडके रोडला असलेल्या शामराव विठ्ठल बँकेच्या एटीएम मशीनमधून पाच हजार रूपये काढले. त्यानंतर ते फडके रोडने चालत डोंबिवली रेल्वे स्टेशनकडे येत होते. बाटाच्या शोरूमजवळ त्यांना दोन अनोळखी इसम भेटले. त्या अनोळखी इसमांनी देवी-देवतांबद्दल माहिती देऊन शंतनू यांना बोलण्यात गुंतवले. त्यातील एकाने तुम्ही आता श्री गणेशाचा मनात जप करत १०१ पावले चाला. त्याकरिता तुमच्याकडे असलेल्या सर्व वस्तू बॅगेत ठेवा असे सांगितले.
त्या इसमाच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन शंतनू यांनी त्यांच्याकडील सोन्याची चेन, सोन्याची अंगठी, टाईटन कंपनीचे घड्याळ, पाच हजारांची रोकड, बँकेची कागदपत्रे, एटीएम कार्ड बॅगेत ठेवले. तुम्ही आता मत्र जंप सुरू करा आणि तुमच्या हातातील बॅग माझ्या मित्राकडे द्या आणि तुम्ही आता सरळ १०१ पावले चालत जा, असे सांगितले. शंतनू यांनी चालण्यास सुरूवात केली. थोडे अंतर पुढे जाऊन पाठीमागे वळून पाहिले असता ते दोन्ही अनोळखी इसम दिसेनासे झाले. या प्रकाराने शंतनू यांनी कपाळावर हात मारून घेतला. आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन घडलेल्या प्रकारची हकिकत सांगितली. पोलिसांनी शंतनू मित्रा यांच्या फिर्यादीवरून ९०हजारांचा ऐवज असलेल्या बॅगसह पसार झालेल्या दोघा फरार बदमाशांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांची पथके सीसीटिव्ही फुटेजच्या साह्याने त्या भामट्यांचा शोध घेत आहेत.