• Sat. Sep 21st, 2024

बळीराजाच्या आकाशाकडे नजरा; धूळपेरणी होऊन पाऊस नाही, दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता

बळीराजाच्या आकाशाकडे नजरा; धूळपेरणी होऊन पाऊस नाही, दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता

गणेश जाधव, फुलंब्री : मान्सून येईल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कपाशी आणि मका पिकाची धूळपेरणी केली. मान्सूनचे आगमन लांबले आणि अवकाळी पाऊस आला. अवकाळी पावसाने धूळपेरणी धोक्यात आली असून, ज्या शेतकऱ्यांजवळ पाण्याची सोय आहे, अशा शेतकऱ्यांनी शेतातील पिके वाचविण्याची धडपड सुरू केली आहे.तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी धूळपेरणी केली आहे. काही गावांत ३० ते ४० टक्के शेतकऱ्यांनी कपाशीची धूळपेरणी केली. धूळपेरणी करून शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. आता शेतकरी आतुरतेने पावसाची वाट पाहत आहे. मध्यंतरी मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन झाले. मान्सून कोकणात पोहोचला आणि काही दिवसांतच मराठवाडा, विदर्भात येईल, अशा बातम्या येऊ लागल्या. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात धूळपेरणी सुरू केली. मात्र, सगळ्यांचे अंदाज फोल ठरले आणि पावसाने ओढ दिली. मध्यंतरी तालुक्यातील काही भागांत बुधवारी अवकाळी पाऊस झाला. या पावसाने शेतात असलेले बियाणे ओले झाले. दोन-तीन दिवसांत पाऊस पडला नाही, तर संपूर्ण धूळपेरणीच वाया जाण्याचा धोका आहे. अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांकडे ओलिताची सोय आहे, असे शेतकरी आपल्या शेतातील पिके वाचवण्याची धडपड करीत आहे. त्यांनी तुषार सिंचन चालू करून पिके वाचविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मुळातच ओलिताची सोय खूप कमी शेतकऱ्यांकडे आहे. ज्या शेतकऱ्यांकडे ओलिताची सोय असेल तो शेतकरीसुद्धा मोठ्या कालावधीसाठी शेती क्षेत्र ओलिताखाली ठेवू शकत नाही. वीज आणि पाणीटंचाई या दोन्ही गोष्टींचा सामना त्यांना करावा लागतो. Weather News : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: पाऊस लांबला, कृषी खात्याने केलं महत्त्वाचं आवाहन
…अन्यथा दुबार पेरणीचे संकट

सध्या तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी धूळपेरणी केली आहे. आता यावर पावसाची तीव्र गरज आहे. ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे, ते शेतकरीसुद्धा फार क्षेत्र ओलित करू शकत नाही. त्यांच्या समोरही विविध अडचणी आहेत. सद्यस्थितीत पावसाचे कुठलेच चिन्ह नाही. सर्वत्र कडकडीत उन्ह वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत आहे. येत्या एक-दोन दिवसांत पाऊस आला नाही, तर शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. सध्या शेतकरी पीक वाचविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहेत. परंतु, शेवटी पावसाने ओढ दिली, तर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार असल्याचे चिन्ह आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed