श्री ज्ञानेश्वर माउलींचे निस्सीम भक्त असलेल्या हैबतबाबानी सन १८३२ मध्ये माउलींचा पालखी सोहळा सुरु केला. आज त्यांचे वंशज बाळासाहेब आरफळकर पवार हे सोहळ्याचे मालक असून त्यांच्या अधिपत्याखाली सोहळा चालतो. पालखी सोहळा प्रस्थान ठेवीत असताना श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी माउलींच्या पादुका हैबतबाबांचे वंशज बाळासाहेब आरफळकर यांच्या स्वाधीन करते. आळंदी ते पंढरपूर व परत आळंदीला माघारी येईपर्यंत त्या त्यांच्या ताब्यात असतात. नीरा स्नानाचा मानही त्यांना आहे.
आज (रविवार) सकाळी साडेसहा वाजता पालखी सोहळ्याने वाल्हेकरांचा निरोप घेतला. सकाळी १०.२० वाजता तो नीरा येथे पोहचला. येथे असंख्य भाविकांनी सोहळ्याचे स्वागत केले आणि माउलींचे दर्शन घेतले. येथे दुपारी एकपर्यंत सोहळा विसावला. दुपारी एक वाजता माउलींसह वैष्णवांनी पुणे जिल्ह्याचा निरोप घेतला. पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोहळ्याला निरोप देण्यात आला.
शाही नीरा स्नान
फुलानी सजविलेल्या चांदीच्या रथात विराजमान झालेल्या ज्ञानराजांनी नीरा नदी पार करुन सातारा जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश केला. नीरा स्नानासाठी माउलींच्या पादुका हैबतबाबांचे वंशज राजाभाऊ पवार- आरफळकर यांच्या स्वाधीन केल्या. त्यांच्या समवेत पालखी सोहळा प्रमुख योगेस देसाई, विलास ढगे पाटील लक्ष्मीकांत देशमुख हे होते. माउली, माउली नामाचा जयघोष करीत त्या नीरा नदी तीरावरील दत्त घाटावर आणण्यात आल्या . दत्त घाटावर हजारो भाविकानी गर्दी केली होती. नीरा नदीवरील माउलींच्या या शाही स्नानाचा सोहळा हजारो भाविकानी आपल्या डोळ्यात साठविला.
सातारा जिल्ह्यात उत्साही स्वागत
नीरा स्नान उरकून दुपारी दीड वाजता अश्र्वानी व पावणे दोन वाजता माउलीनी शूर विरांच्या व गुरु हैबतबाबांच्या सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. यावेळी सातारा जिल्ह्याच्या वतीने पालकमंत्री शंभूराज देसाई, माजी मंत्री बाळासाहेब पाटील , साताराचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्यासह असंख्य जिल्हावासियांनी ज्ञानराजांसह पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात स्वागत केले. पाडेगाव येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे झांज पथकाचे स्वागत स्वीकारून हा सोहळा लोणंदकडे मार्गस्थ झाला. सायंकाळी पाच वाजता समाज आरतीनंतर सोहळा येथे विसावला.
पालखी सोहळ्यादरम्यान तीन वेळा माउलींना स्नान
कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानराजांच्या पालखी सोहळ्यात एकूण मार्गांमध्ये तीन वेळा ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना स्नान घातलं जातं. सर्व प्रथम आळंदीत प्रस्थान होण्याआधी माऊलींच्या पादुकांना इंद्रायणी नदीमध्ये स्नान घातलं जातं. त्यानंतर आज निरा नदीमध्ये आणि शेवटी पंढरपूरला पोहोचल्यानंतर चंद्रभागा नदीमध्ये स्नान घातलं जातं.
मंगळवारी पहिले उभे रिंगण तरडगावला
पालखी सोहळ्यात तरडगावजवळील चांदोबाचा लिंब, वाखरीजवळील बाजीराव विहीर व पंढरपूरजवळील इसबावी येथे उभे तर पुरंदावडे, खुडुस फाटा, ठाकुरबुवा व वाखरी जवळ गोल रिंगण घेण्यात येते. मंगळवार दि. २० रोजी पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण चांदोबाचा लिंब येथे दुपारी दोन वाजता होईल.