माननीय मुख्यमंत्र्यांची ओरिजनल शिवसेना आहे, अधिकृत शिवसेना आहे, बाळासाहेबांच्या शिवसेने मध्ये मी आहे, यापुढंही काम करत राहीन असं मनिषा कायंदे म्हणाल्या. मी २०१२ मध्ये पक्षात प्रवेश केला. मी विधानपरिषद आमदार झाले, प्रवक्ता झाले. सभागृहात असेल, सभागृहाबाहेर असेन मी पक्षाचं काम केलं. एकनाथ शिंदे यांनी मला देखील वेळोवेळी सहकार्य केलं आहे. मला विधानपरिषदेत संधी दिल्याबद्दल मी पक्षप्रमुखांचे आभार मानलेले आहेतच, असंही कायंदे म्हणाल्या.
हे सरकार एक वर्ष पूर्ण करत आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार काम करत आहे. लोकांनी नावं ठेवली पण एकनाथ शिंदे यांनी कामातून उत्तर दिलं. महाराष्ट्रात झपाट्यानं काम सुरु आहे. जे प्रकल्प तीन तीन वर्ष थांबले होते. मेट्रो प्रकल्प असेल, समृद्धी महामार्गाचं काम झालं. संभाजीनगरच्या नामांतराचा निर्णय देखील झाला. उद्धव ठाकरे यांनी वर्षभरात पक्षबांधणीचं काम केलं नाही. सकाळी उठून थुकरटवाडी करणारे लोक शिवसेनेचे चेहरे कसे, असा सवाल कायंदे यांनी केला.
महाविकास आघाडी झाली हा निर्णय जुन्या शिवसैनिकांना आवडलं नव्हता. सरकारचं काम व्यवस्थित झालं नाही. पक्षप्रमुखांशी बोलताना अडचण येत असेल, पक्षप्रमुखांशी बोलू शकत नाही, मनोगत व्यक्त करु शकत नाही. कुणी कार्यकर्त्यांकडून पैसे उकळतं, महिला शिवसैनिकांकडून पैसे उकळत असेल तर योग्य नव्हतं, असं कायंदे म्हणाल्या.
मी एक वर्ष विचार करत होते. माजी पर्यावरण मंत्र्यांना मी सांगते की कचऱ्यातून ऊर्जा निर्मिती होते. एकनाथ शिंदे लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री सकाळी मुंबईत, दुपारी मध्य प्रदेशात त्यानंतर पंजाबमध्ये त्यानंतर दुसऱ्या दिवशी नवी मुंबईत असतात. मला काम करायचं आहे. मला सकारात्मक काम करायचं आहे. वर्षभरानं टर्म संपणार आहे. शिवसैनिकांची टर्म कधी संपणार नसते, असं मनिषा कायंदे म्हणाल्या. नेतृत्त्व बदल झाला आहे. पक्ष तोच आहे. एकनाथ शिंदे तेव्हाही आमचे नेते होते. आजही आमचे नेते आहे. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे आशास्थान बनले आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाचा विश्वास आहे. बाळासाहेबांची शिवसेना आहे हा विश्वास केंद्राचा आहे. काँग्रेस राष्ट्रवादीची स्क्रिप्ट वाचण्याचं काम सुरु आहे. कार्यकर्त्यांचं दु:ख काय आहे हे ऐकायचं नसेल तर आम्ही कुणाकडे बघायचं. एकनाथ शिंदेंनी मला खूप मोठा मान सन्मान दिला आहे. संघटनात्मक कामाचा अनुभव असून पक्षबांधणीत योगदान द्यायचं आहे, असं मनिषा कायंदे म्हणाल्या.
मनिषा कायंदे यांनी बाळासाहेबांच्या विचाराच्या खऱ्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा देतो, असं एकनाथ शिंदे म्हणाले.