• Sat. Sep 21st, 2024

Navi Mumbai News : साथीच्या आजारांबाबत नवी मुंबई महापालिका दक्ष, आरोग्य केंद्रांना सज्जतेचे निर्देश

Navi Mumbai News : साथीच्या आजारांबाबत नवी मुंबई महापालिका दक्ष, आरोग्य केंद्रांना सज्जतेचे निर्देश

म. टा. प्रतिनिधी, नवी मुंबई : पावसाळ्यातील साथीच्या आजारांचा धोका लक्षात घेऊन, या आजारांवर नियंत्रण आणून नवी मुंबई शहराचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी नवी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांना दक्ष राहण्याचे निर्देश आरोग्य विभागप्रमुखांनी दिले आहेत. साथीचे आजारांप्रमाणे राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत साप्ताहिक वेळापत्रकानुसार डास अळीनाशक फवारणी व रासायनिक धुरीकरणावर लक्ष देण्यात येणार आहे.

नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी शहर आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत आरोग्य विभागास दिलेल्या निर्देशांनुसार कार्यवाही करण्यात येत आहे. पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील यांनी २३ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय सहाय्यक यांची विशेष बैठक घेत साथीचे आजार नियंत्रित ठेवण्यासाठी सतर्क राहण्याचे निर्देश दिले. पावसाळ्यात गच्चीवर, घराच्या परिसरात भंगार साहित्य, रिकाम्या बाटल्या, करवंट्या, रंगांचे डबे, पाण्याच्या बाटल्या, घरावर टाकलेले प्लास्टिक, कुंड्यांखालील ताटल्या यामध्ये पाणी साचून डास अंडी घालतात. त्यामुळे अशा निरुपयोगी वस्तू नष्ट करण्याचा संदेश व्यापक प्रमाणात नागरिकांपर्यंत पोहचवण्याच्या सूचना त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना केल्या.
Video: सुरक्षा रक्षकाने दिलं पेशंटला इंजेक्शन, लातूरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रकार
प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रातील बाह्यरुग्ण सेवांतर्गत तापाच्या प्रत्येक रुग्णाची रक्ततपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले. केंद्रनिहाय हिवताप, डेंग्यू रुग्णांबाबत अतिसंवेदनशील कार्यक्षेत्रांचा स्पॉट मॅपिंगद्वारे कृती आराखडा तयार करून घरांत डासांची उत्पत्तिस्थाने शोधण्यासाठी मोहीम राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या. कार्यक्षेत्रातील सर्व बांधकाम ठिकाणांची यादी अद्ययावत करून आठवड्यातून एकदा पाहणी करून संभाव्य डासउत्पत्ती स्थाने नष्ट करावीत, बांधकाम मजुरांचे नियमित ताप सर्वेक्षण, त्वरित रक्ततपासणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या. सर्व विभागांमध्ये ध्वनिक्षेपक व हस्तपत्रकांद्वारे हिवताप, डेंग्यू अशा कीटकजन्य आजारांबाबत जनजागृती केली जात आहे.

पालिका क्षेत्रामधील प्रत्येक नागरिकाने जागरूक राहून आपल्या घरात व परिसरात पाणी साचून राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, तसेच हिवताप, डेंग्यूची लक्षणे आढळल्यास नजिकच्या महापालिका प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, महापालिका रुग्णालयात वैद्यकीय सेवा घ्यावी, महापालिकेमार्फत घरी भेट देणाऱ्या कर्मचाऱ्यास संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त नार्वेकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed