देशातील काही भागात अलीकडेच अशा घटना उघडकीस आल्या. ठाण्यातील मुंब्रामध्येही असे प्रकार समोर आले आहेत. त्यानंतर आता संगमनेरसारख्या निमशहरी भागातही असा प्रकार घडला आहे. PUBG या गेमच्या माध्यमातून हे प्रकार सुरू आहेत. संगमनेर येथील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलीला याद्वारे जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची तक्रार आहे. त्यानुसार पोलिसांनी अक्रम शाहाबुद्दिन शेख याला अटक केली आहे.
आरोपी शेख याने या २२ वर्षीय तरुणीशी ऑनलाइन गेमच्या माध्यमातून ओळख वाढविली. तो बिहारचा आहे. ओळख वाढल्यानंतर तिला भेटण्यासाठी एका मित्राला सोबत घेऊन तो थेट संगमनेरला आला. येथे आल्यावर तरुणीसोबत गोड गोड बोलत आरोपी अक्रम तिला एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला. तेव्हा तरूणी सावध झाली. काहीतरी वेगळे घडत आहे, याची जाणीव झाल्याचे लक्षात येतात तिने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपी तिच्यासोबत बळजबरी करू लागला. आपण बिहारला जाऊ, लग्न करू, असे तिला म्हणू लागला. तरीही ती ऐकत नसल्याचे पाहून तिला धमक्याही देऊ लागला.
तरुणीने तिच्या नातेवाईकांशी संपर्क करून याची माहिती दिली. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनीही तातडीने हाचलाची केल्या. तरुणीच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली. त्याच्याकडे चौकशी केली असता तो आणखी काही तरुणींच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली आहे. त्याने अशा आणखी मुलींना फसविले का? धर्मांतर घडवून आणण्याचा त्याचा प्रयत्न आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.