गोखले उड्डाणपुलाचे पाडकाम पश्चिम रेल्वे, तर पुलाची पुनर्बांधणी मुंबई महापालिका करत आहे. पूल पुनर्बांधणीचे काम मे २०२३पर्यंत पूर्ण करून किमान एक मार्गिका सुरू करण्याचा प्रयत्न होता. या पुलाच्या आरेखनाला पश्चिम रेल्वेने २ फेब्रुवारीला मंजुरी दिली होती. त्यानंतरही कामाला फारशी गती मिळालेली नाही.
पुलाच्या बांधणीत स्टील उपकरणाचा वापर होणार असून यासाठी दोन उत्पादक आहेत. एका उत्पादकाच्या प्लांटमध्ये अचानक अनिश्चित काळासाठी झालेल्या संपामुळे पुलासाठी लागणाऱ्या साहित्य पुरवठ्यावर परिणाम झाला. त्याचा पुलाच्या पुनर्बांधणीवर परिणाम झाल्याने मे महिन्यापर्यंत खुला होणारा पुलाची ही मुदतही हुकली. एप्रिलमध्ये मुंबई महापालिकेकडून नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत गोखले पूल खुला करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती देण्यात आली होती. आता पुन्हा एकदा नवीन मुदत मुंबई महापालिकेने दिली आहे.
तारिख पे तारिख
गोखले उड्डाणपूल सुरू होण्यासाठी वेळोवेळी नवीन मुदत दिली जात असून तोपर्यंत परिसरातील रहदारीवर मात्र ताण पडत आहे. पुलाच्या कामासाठी स्टील गर्डर आणि अन्य साहित्य मिळण्यास काहीसा विलंब होत आहे. त्यामुळे कामावर परिणाम होत आहे. यासंदर्भात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी गोखले पूल डिसेंबरपर्यंत सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. या कामासाठी नेमलेल्या कंपन्यांकडूनही सतत आढावा घेण्यात येत असल्याची माहिती दिली.
नाला रुंदीकरणाला फटका
-गोखले उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामाचा फटका मोगरा नाला रूंदीकरणालाही बसला आहे. अंधेरी सबवे खालून हा नाला वाहतो. सध्या पुलाचे काम सुरू असल्याने अंधेरी आणि मिलन सबवे येथून सर्व वाहतूक वळवली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा असते. परिणामी, मोगरा नाल्याचे रूंदीकरण काम करणे अशक्य झाले आहे.
पम्पिंग स्टेशनही रखडले
-पुलाच्या रखडलेल्या कामाचा फटका मोगरा पम्पिंग स्टेशनच्या कामालाही बसला आहे. या स्टेशनची पाणी साठवण टाकी आणि मुख्य जलवाहिनीचे काम पालिकेला यामुळे सुरू करता आलेले नाही. पम्पिंग स्टेशनवर सात पंप बसवण्याचे प्रस्तावित आहे. तर पश्चिम रेल्वेच्याखाली मायक्रो-टनेलिंग पद्धतीने जलवाहिनी टाकण्यात येणाप आबे. ही दोन्ही कामे रखडली आहे. पालिकेकडून अंधेरी सबवे येथील मिनी पम्पिंग स्टेशन सुरू करण्याचा प्रयत्न आहे. सध्या या पम्पिंग स्टेशनचे काम जवळपास झाले असून यंदाच्या पावसाळ्यात पम्पिंग स्टेशन उपलब्ध असेल. त्यामुळे या परिसरात पाणी तुंबल्यास या पम्पिंग स्टेशनचा काहीसा दिलासा मिळेल, अशी माहिती पालिकेने दिली.
‘निर्णय नियोजनाविना’
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नालेसफाई पाहणी दौऱ्यादरम्यान गोखले पुलाच्या कामाची पाहणीही केली होती. त्यावेळी पुलाचे काम लवकरच पूर्ण होईल, अशी माहिती दिली होती. त्यानंतर काँग्रेसनेते संजय निरुपम यांनीही पुलाची पाहणी केली. गेले २० महिने पूल वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे अंधेरीसह जुहू, वर्सोवा ते जोगेश्वरी पर्यंतच्या अनेक मार्गांवर प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. पूल वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय कोणतेही नियोजन न करता घाईघाईने घेतलेला आहे, अशी टीका करून त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले.